पोलिसांसमोर हजर राहण्याचे प्रा. तेलतुंबडेंना निर्देश

जामीन अर्जावर 22 फेब्रुवारीला सुनावणी

अटक झाल्यास 1 लाखाच्या बॉन्डवर सुटका

मुंबई : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर 22 फेब्रुवारीला सुनावणी घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. राज्य सरकारने तेलतुंबडेना 12 फेब्रुवारीपर्यत अटक न करण्याची दिलेली हमी अर्जाच्या सुनावणीपर्यंत वाढविण्यास नकार देत पुणे पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश दिले.

पुणे पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपाखाली तेलतुंबडेंवर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च व सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र 11 फेब्रुवारीपर्यंत तेलतुंबडेना अटकेपासुन दिलासा दिला. त्यानंतर पुणे कनिष्ट न्यायालयने चार दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या वतीने ऍड. मिहिर देसाई यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सुनावणी घेण्यात आली.

यावेळी अर्जाला विरोध करणाऱ्या पुणे पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत आज मिळाल्याने ऍड.मिहिर देसाई यांनी दोन दिवसांची मुदत न्यायालयाकडे मागितली. याला पुणे पोलिसांच्या वतीने ऍड. अरुणा कामत-पै यांनी जोरदार विरोध केला. उद्यापर्यंत अटक न करण्याची पोलिसांनी दिलेल्या हमीत आणखी मुदतवाढ देण्यास विरोध दर्शविला.

याची दखल घेऊन न्यायालयाने प्रा.आनंद तेलतुंबडे यांनी 14 आणि 18 फेब्रुवारीला पुणे पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी जर अटक केली तर 1 लाखाच्या बॉन्डवर सुटका करण्याचे निर्देश देऊन जामिन अर्जाची सुनावणी 22 फेब्रुवारीपर्यंत तहकूब ठेवली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)