पोलिसांवर उगारलेले हात थांबायला पाहिजेत

हिंसक मानसिकतेला आळा बसणार का? कायद्याच्या धाकासोबत खाक्याची गरज 

प्रशांत जाधव
सातारा, दि. 3 -पोलिस आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. पोलिसांना मदत करावी, या सोशल मीडियावरील बाता बंद करून आता समाजाने पोलिसांच्याप्रती सक्रीय व्हायला पाहिजे. त्याचे कारण ही तसेच आहे, आजकाल किरकोळ कारणावरून पोलिसांवर हात उगारण्याची मानसिकता समाजात जोर धरू लागली आहे. सातारा जिल्ह्यात एका वर्षात पाच ठिकाणी पोलिसांवर हात उचलला गेल्याची कागदोपत्री नोंद आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मारकुट्या, हिंसक मानसिकतेचा तात्काळ बंदोबस्त करावा, तसेच या प्रवृत्तींना कायद्याच्या धाकासोबतच पोलिसी खाक्या दाखवलाच पाहिजे.
सातारा जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. पोलिसांचा लोकांवरील धाक कमी झाला की लोकांची मुजोरी वाढली. याची उत्तरे वेळीच शोधली नाही तर समाजात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कोणी पोलिस पुढे येणार नाही. गतवर्षी फलटण ग्रामीणचे पोलिस कॉन्स्टेबल महेश भोसले यांच्यावर एका जमातीतील गुन्हेगाराने हल्ला केला होता. त्यानंतर फलटणचे तत्कालीन पो.नि. प्रकाश धस यांनाही पोलिस ठाण्यातच मारहाण झाली होती. दोन दिवसांपुर्वी सातार्‍यातील जिल्हा न्यायालयात कैद्याने पोलिस हवालदाराच्या कानशिलात लागावली. कर्‍हाडला तर चहाची टपरी बंद करण्यास सांगितले म्हणून चक्क पोलिसाच्या डोक्यातच दगड घातला. तर म्हसवडला बॅनर काढला म्हणून पोलिस ठाण्यात जाऊन जाब विचारत पोलिसांना धक्काबुक्की करण्यापर्यंत लोकांची मजल गेली. अर्थात ज्यांनी हे कृत्य केले ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतीलही , मात्र सद्विचार,वर्तनाच्या विस्कळीत मानसिकतेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीची मुजोरी वाढली आहे.

पोलिसांचं तद्दन हिंदी सिनेमाइतकं नुकसान गुन्हेगारांनीही केलं नसेल. हिंदी सिनेमाने एकतर त्याला सुपरहिरो करून टाकला नाहीतर सुपर व्हिलन. त्याचा प्रामाणिकपणा हा भाबडा आदर्शवाद म्हणून दाखवला आणि त्याची दुर्बलता त्याचा अवगुण म्हणून. अर्धसत्य,शूल,सरफरोश,अब तक छप्पन,ब्लॅक फ्रायडे सारखे मोजके सिनेमे ज्यांनी पोलिसांचा युनिफॉर्म सोलून आत असलेला माणूस दाखवला, आणि त्यालाही स्वभाव असतो, राग, हतबलता, जबाबदारी असते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यालाही एक भूतकाळ असतो याची जाणीव करून दिली. या सगळ्या सिनेमांनी पोलीस या एन्टिटीकडे ज्या नजरेनी पाहिलं त्याच नजरेने आपण आज त्याच्याकडे पाहणं प्रचंड गरजेचं आहे.

याची कारणं खूप आहेत. आज पोलीस हे दडपणाखाली जगतायत. त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. मामुली चेन स्नॅचिंगपासून खासगी सावकारांच्या रॅकेटपर्यंत आणि भुरट्या गुंडापासून जागतिक दहशतवादापर्यंत सगळ्याची जबाबदारी फक्त त्यांच्यावर आहे. त्यांची अवस्था गोलकीपरसारखी आहे आणि समोर हजारो प्लेयर्स बॉल घेऊन तयार आहेत. तो अडवला तर कर्तव्य आणि नाही तर चूक , या एकाच तत्त्वावर आज त्यांच्याशी सगळ्या स्तरातून वागले जाते. याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे , कारण त्यांच्यावर जबाबदार्‍या प्रचंड आहेत आणि त्याबदल्यात मिळणारा मोबदला; अत्यंत किरकोळ !

पोलिसांमध्ये आणि जनतेत गेल्या काही काळापासून वारंवार उडणार्‍या चकमकी हे आपल्यात पडत चाललेल्या दरीचं आणि पोलिसांमध्येही असलेल्या कमालीच्या असंतोषाचे निदर्शक आहे. याची वेळीच दखल घ्यायला हवी. दुबळ्या माणसांवर पोलिसांचा दिसणारा खाक्या, हा त्यांच्या शक्तीपाताचा परिणाम आहे, सक्षम वाटण्याचा नाही, हे समजून घ्यायला पाहिजे.
सरकार आपल्याला गुलाम म्हणून वागवते आणि जनता गुंड म्हणून ही भावना पोलिसांमध्ये प्रबळ होत राहिली. तर त्यांच्यातल्या असंतोषाचा स्फोट आपल्याला फार महागात पडेल याचा विचार करून समाजाने पालिसांप्रति आपली मानसिकता बदलायला पाहिजे तसेच पोलिसांनी ही जनते बद्दलची सेवा भावना जागृत ठेवली पाहिजे.

नेमकं कारण शोधण्याची गरज
गेल्या वर्षभरात पोलिसांवर हात उचलण्याच्या घटना वाढत आहेत. या घटनांमागचे नेमक कारण शोधणे गरजेचे आहे. यापूर्वी समाजात पोलिसांबद्दल आदर होता. आता ही आदराची भावना कमी झाली असून यामुळेच या घटना घडू लागल्या आहेत. पोलिसांबद्दलत जनतेतून चांगली-वाईट मते व्यक्त होताना दिसत आहे. जशी टाळी एका हाताने वाजत नाही तसेच विनाकरण कोणी पोलिसांवर हात उचलणार नाही, त्यामुळे या घटनांमागील नेमकं कारण शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

धाकासोबत खाक्या दाखवाच
जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख म्हणजे मितभाषी अधिकारी. त्यांचे काम बोलते. मात्र याच पध्दतीचा अनेकांनी गैरफायदा घेण्याचे नियोजन केले आहे. कोणीही उठतो आणि पोलिस कर्मचारी,अधिकार्‍यांवर आरोप करतो. यामुळे पोलिसांची काम करण्याची मानसिकता खचत चालली आहे. मारहाणीच्या घटना घडत आहेत. याचा सारासार विचार करून कायद्याच्या धाकासोबत थोडा तरी खाक्या दाखवाच. अन्यथा गुंडाचा मस्तवालपणा सगळ्यांच्याच डोक्याला ताप होईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)