पोलिसांनी जप्त केल्या 8 तलवारी, 3 गुप्त्या

एकास अटक : निवडणूक काळात दहशत माजविण्या प्रयत्न

भवानीनगर- तलवार व अन्य शस्त्र जवळ बाळगून दहशद माजविणारा व विक्री केल्याप्रकरणी बारामती उपविभाग गुन्हे शोध पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून आठ तलवारी आणि तीन गुप्त्या जप्त केल्या आहेत.

अटक केलेल्या आरोपीचे नाव सचिन मगन गंधारे (वय 28, शेळगाव, ता. इंदापूर) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. 27) पोलीस हवालदार शिवाजी निकम यांना खबऱ्यामार्फत शेळगाव येथील शेळगावपाटी येथे एक व्यक्ती हातात तलवार घेऊन लोकांवर दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग जयंत मीना व उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना दिली.

सदरची बाब ही निवडणुकीच्या अनुषंगाने गंभीर स्वरुपाची असल्याने सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता सचिन गंधारे हा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असताना तसेच जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (1) ब (3) चा आदेश लागू असताना देखील हातात तलवार घेऊन लोकांवर दहशत माजवत असल्याचे दिसून आले. त्याने ओळखीच्या लोकांना विक्री करीता तलवारी, गुप्त्या आणल्या होत्या. त्यामुळे गंधारे याच्या विरोधात वालचंदनगर पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा अधिनियम कलम 5, 25 तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1) ब (3) 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती उपविभाग गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे, पोलीस हवालदार शिवाजी निकम, संदीप मोकाशी, संजय जगदाळे, सुरेंद्र वाघ, बाळासाहेब भोई, पोलीस नाईक संदीप कारंडे, संदीप जाधव, अभिजित एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे, सदाशिव बंडगर, गणेश काटकर, लखन साळवी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)