पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करणाऱ्याला अटक

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन आलेल्या इसमास पोलीस निरीक्षक समजावून सांगत असताना विरोधी व्यक्तीवर लगेचच कारवाई करा, असे म्हणत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जावून शिवीगाळ, दमदाटी करून पोलीस ठाणे अंमलदार व पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करणाऱ्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी स्वतः गुन्हा दाखल करीत त्या इसमास अटक केली आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे सणसवाडी येथील गावभेट दौरा उरकून पोलीस स्टेशनमध्ये येऊन कार्यालयीन काम करीत होते. त्यावेळी कोरेगाव भिमा येथील रामदास ढेरंगे हे त्यांच्या पत्नी व मुलासह पोलीस स्टेशनला आले आणि आम्हाला पोलीस उपअधिक्षकांनी पोलीस उपअधिक्षकांनी तुम्हाला भेटण्यास पाठविले आहे, असे सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनी ढेरंगे कुटुंबियांना बसण्यास सांगितले. तक्रार ऐकून घेतल्यानंतर विरोधी व्यक्तीला उद्या बोलावून घेतो व पुढील कारवाई करतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, ढेरंगे यांनी आमचा जमिनीचा वाद आहे त्याला न बोलावता त्याच्यावर कारवाई करा, असे म्हणत ढेरंगे हे मोठमोठ्याने बोलू लागले, त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता, ढेरंगे हे पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले व अरेरावी करीत उद्धटवर्तन केले. त्यांनतर रामदास ढेरंगे हे त्यांच्या पत्नी व मुलासह पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयाच्या बाहेर आले व पोलिसांना मोठमोठ्याने शिवीगाळ करीत मी तुमचे बोलणे रेकॉर्ड केले आहे, मी तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी देण्यास सुरवात केली. तेंव्हा पोलीस कर्मचारी तसेच ढेरंगे यांची पत्नी आणि मुलगा ढेरंगे यांना समजावून सांगत होते. त्याचवेळी ढेरंगे यांनी ठाणे अंमलदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, पोलीस नाईक अमित चव्हाण यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ, दमदाटी केली. पोलीस स्टेशनच्या शासकीय कामात अडथळा आणला.
याबाबत पोलीस निरीक्षक सदाशिव गोविंद शेलार यांनी स्वतः फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रामदास दादाभाऊ ढेरंगे (रा. कोरेगाव भिमा, ता. शिरूर) यांच्यावर सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की प्रकरणी गुन्हे दाखल करीत अटक केली.

  • ढेरंगेवर यापूर्वीही सरकारी कामात अडथळेचे गुन्हे
    शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ, दमदाटी करीत पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्या रामदास ढेरंगे यांच्यावर यापूर्वी देखील शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा, पोलीस अधिकाऱ्याला चावून दुखापत तसेच आत्महत्येचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हे दाखल असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)