पोलिसांना मारहाण आणि पोलिसांकडून मारहाण

मुकुंद फडके

दोनही गोष्टी चुकीच्याच:पण लक्षात कोण घेणार?

सातारा: कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना नागरिकांकडून होणारी मारहाण आणि कोणताही गुन्हा नसलेल्या निष्पाप नागरिकाला विशेषत: पत्रकाराला पोलिसांकडून होणारी मारहाण या दोनही गोष्टी चुकीच्याच आहेत. पण लक्षात कोण घेणार ही परिस्थिती आहे.वाईमध्ये प्रभातच्या वार्ताहराला पोलिसांकडून झालेली अमानुष मारहाण असो किंवा लोणंदमध्ये वाहतूक पोलिसाला झालेली मारहाण असो आपापले कर्तव्य बजावणाऱ्यांना कोण संरक्षण देणार हाच खरा प्रश्‍न आहे.विशेषत: पोलिसांनी पत्रकाराला केलेली मारहाण हा अधिक गंभीर विषय आहे.
पत्रकारांवरील होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याच्या मागणीसाठी गेल्याच महिन्यात राज्यात सर्वत्र पत्रकार संघटनांनी एक दिवसाचे आंदोलन केले होते.पण आता पोलिसांनीच पत्रकारांना मारहाण केली तर कायद्याचे पालन होणार तरी कसे? समाजावरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत. परंतु, पत्रकारांना संरक्षण देणाऱ्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. यामुळे पत्रकार असुरक्षित झाले आहेत. या कायद्याची कठोर अंमलबजावणी होण्याची गरज आहे अशी मागणी अनेकवेळा करण्यात येउनही अद्याप ती पुर्ण झाली नाही.उलट राज्यात कोठे ना कोठे सतत कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना मारहाण करण्याचे प्रकार घडत असतात,सर्वसाधारपणे पत्रकाराने दिलेल्या बातमीमुळे चिडून किंवा पत्रकाराने बातमी देउ नये म्हणून मारहाण करण्याचे प्रकार होतात.पण जेव्हा पोलिसच पत्रकारांवर हात उचलतात तेव्हा ती गोष्ट अधिक गंभीर होते.कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला मारहाण झाल्यानंतर तमाम पोलिसांना जेवढे दु:ख होते तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त दु:ख पत्रकारांना मारहाण झाल्यावर तमाम पत्रकारांना होते.ही मारहाण पोलिसांनी केली असेल तर या वेदनेची तीव्रता अधिकच वाढते.
मुळात कोणालाही कोणत्याही कारणाने मारहाण करणेच चुकीचे आणि बेकायदेशीर आहे ही गोष्ट पोलिस लक्षात घेणार आहेत का?जमावाची दंगल रोखण्यासाठी लाठीमार करणे आणि एकाकी पत्रकाराला पोलिस स्टेशनमध्ये कोणतेही कारण नसताना मारहाण करणे यातील फरक वाईच्या पोलिसांनी समजून घ्यायला हवा.कोणत्यातरी गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितावर तपासाचा भाग म्हणून थर्ड डिग्रीचा वापर करणे एकवेळ समजण्यासारखे असले तरी तेही कायदेसंमत नाही.मग कोणतेही कारण नसताना जेव्हा पत्रकाराला मारहाण होते त्याचे समर्थन पोलिस कसे करणार?सांगण्यासाठी पोलिसांकडे अनेक कारणे असतील.तो पत्रकार अरेरावी करीत होता,उध्दटपणे बोलत होता अशी कारणे सांगितली जातील.पण मग तीच कारणे नागरिकांकडून मार खाल्लेल्या पोलिसांबद्दलही सांगता येउ शकतात.कारण अरेरावी काही पोलिसांना नवीन नाही आणि अरेरावीने टोक गाठले की नागरिकांचा संयम संपतो आणि पोलिसावर हात उचलला जातो.पण एवढी टोकाची अरेरावी पत्रकारांकडे नसते.पोलिसांशी संवाद साधताना तर मुळीच नसते.तरीही पोलिसांकडून पत्रकाराला मारहाण होत असेल तरी सिस्टीममध्ये काहीतरी दोष आहे हे मान्य करावे लागेल आणि तो दोष दूर करावा लागेल.

लोकशाहीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणारी पोलिस यंत्रणा आणि समाजातील समस्यांना वाचा फोडणारी प्रसार माध्यमे यांचे काम समान महत्वाचे आहे.अनेकवेळा माध्यमांमुळे पोलिसांना तपासाची दिशा सापडल्याचीही उदाहरणे आहेत.या दोघांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.पण हा समन्वय कायम ठेवण्याची अधिक जबाबदारी पोलिस यंत्रणेची आहे हे विसरुन चालणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)