पोलिसांना फसवण्यासाठी चित्रपटाप्रमाणे आखली होती योजना

हैदराबाद – तीन दिवसांपूर्वी तेलंगणमध्ये गर्भवती पत्नीसमोर पतीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. तेलंगणच्या नालगोंडा जिल्ह्यात रुग्णालयाबाहेर ही धक्कादायक हृदयद्रावक घटना घडली होती. पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे. यातील मुख्य आरोपी आणि मुलीचा वडील टी मारुती राव याने पोलिसांनी आपल्याला पकडू नये यासाठी दृश्‍यम चित्रपटाप्रमाणे योजना आखली होती.

दृश्‍यम चित्रपटात ज्याप्रमाणे अजय देवगण आपल्या पत्नी आणि मुलींना पोलिसांपासून वाचवण्यासाठी खोटी दृश्‍यं उभी करत पोलिसांना चकवतो, अगदी तसाच प्रयत्न टी मारुती राव याने केला.

-Ads-

नालगोंडाचे पोलीस अधिक्षक ए व्ही रंगनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मारुती राव याने दृश्‍यम चित्रपटाप्रमाणे खोटे पुरावे उभे करत आपण निर्दोष आहोत असं दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. 14 सप्टेंबरला जेव्हा हत्या झाली त्याच्या दोन तास आधी मारुती राव संयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात गेला होता. तिथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन हत्या झाली तेव्हा आपण येथेच होतो असं भासवण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी नालागोंडाला जात असताना त्याने उपपोलीस अधिक्षकांना पाहिलं आणि गाडीतून उतरुन त्यांच्याशी गणेशोत्सव तयारीच्या बहाण्याने मुद्दामून चर्चा केली.

आरोपी मारुती रावने इतके प्रयत्न करुनही तो यशस्वी होऊ शकला नाही. आमच्याकडे हत्येत त्याचा हात असल्याचे तांत्रिक आणि इतर पुरावे आहेत असं पोलीस अधिक्षक ए व्ही रंगनाथ यांनी सांगितलं आहे. आरोपी मारुती रावने हत्येचा कट आखत असल्याची कल्पना आपल्या पत्नीलाही लागू दिली नाही. मारुती रावने आपली मुलगी अमृता आणि जावयाची माहिती मिळवण्यासाठी पत्नीचा वापर केला. अमृता गरोदर असल्यापासूनच ती रोज आईशी बोलत होती. 13 सप्टेंबरला अमृताने आईशी बोलताना आपण शनिवारी 14 सप्टेंबरला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात जाणार असल्याची माहिती दिली.

पुढे काय होणार आहे याची कल्पना नसणाऱ्या पत्नीने ही माहिती मारुती रावला दिली. मारुती रावने लगेचच ही माहिती सहआरोपी अब्दुल बारीला दिली. बारीने असगर अली आणि त्याने सुभाषला कळवलं, असं रंगनाथ यांनी यावेळी सांगितलं.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)