पोलिसांच्या वाहनासह अग्निशामक बंबावर दगडफेक

पाथर्डी - येथे मराठा समाजाच्या वतीने ठिय्या देण्यात आला.

पाथर्डी – महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्‍यात शंभर टक्‍के बंद पाळण्यात आला. शहरातील वसंतराव नाईक चौकात आंदोलकांनी सुमारे चार तास चक्काजाम आंदोलन केले. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी आंदोलकांनी टायर पेटवून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला. तनपुरवाडीजवळ आंदोलकांनी महामार्गावर पेटवलेले टायर विझवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर व अग्निशामक बंबाच्या गाडीवर आंदोलकांनी दगडफेक केली. यामध्ये अग्निशामक गाडीची काच फुटली. या घटनेमुळे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागून शहरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण राहिले.

तालुक्‍यातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. खरवंडी, माणिकदौंडी, करंजी, तिसगाव, मिरी, भालगाव, शिराळ, भोसे येथेही बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून तर काही ठिकाणी भजन करत “रास्ता रोको’ आंदोलन केले. पाथर्डी शहरातही बंदच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. शहरातील वसंतराव नाईक चौकात हजारो आंदोलकांनी सुमारे चार तास “रास्ता रोको’ आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केदारेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल व तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी आंदोलकांनी निवेदन देऊन सुमारे चार तासानंतर आंदोलन मागे घेतले. तालुक्‍यातील प्रत्येक गावात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते.त्यामुळे शहराकडे येणारी संपूर्ण वाहतूक ठप्प होती.

बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानेही आपली सेवा पूर्णपणे बंद ठेवली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. सर्वच महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी “रास्ता रोको’ आंदोलन झाल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. दिवसभर रस्त्यावर वाहतूक मंदावली होती.पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलकांनी टायर पेटवून महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी कमालीची कसरत केली.

महामार्गावर टाकलेली दगड, लोखंडी पोल, पेटलेले टायर वेळोवेळी बाजूला करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. तनपुरवाडी येथे निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत पोलिसांनी अत्यंत संयमाने हाताळून महामार्ग खुला केला. पोलिसांच्या या संयमी भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)