पोलिसांच्या प्रस्तावावर विचार करण्यास मंडळांनी घेतला वेळ

गणेश विसर्जनाचा तिढा अंतीम टप्प्यात; विसर्जन न करण्याचा काही मंडळांचा निर्णय

सार्वजनिक मंडळांच्या दहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती जलतरण तलाव व गोडोली तळ्यात कराव्यात. तसेच दहा फूटांपेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन कण्हेर धरणाजवळील (जलसागर ढाब्यालगत) खाणीतील पाण्यात करण्याचा प्रस्ताव आज पोलिस प्रशासनाने मंडळांपुढे ठेवला. मात्र, मोठ्या मूर्ती असलेली मंडळे मंगळवार तळ्याबाबत अखेरपर्यंत आग्रही राहिल्याने बैठकीत अंतीम तोडगा निघाला नाही. मात्र पोलिसांच्या प्रस्तावाला अनेक मंडळांनी सहमती दाखवल्याने विसर्जनाचा तिडा सुटण्याची चिन्हे आहेत.

मोठ्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन कोठे करायचे असा प्रश्‍न निर्माण झाल्याने पोलिस प्रशासनाने बुधवारी शहरातील 12 फूटांपेक्षा मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांची बैठक बोलवली होती. जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक राजमाने,पो.नि. नारायण सारंगकर, किशोर धुमाळ ,पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे तसेच साताऱ्यातील प्रमुख मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

न्यायालयाच्या निर्णयानुसार मंगळवार तळ्यात मूर्ती विसर्जन करता येणार नसल्याने अन्य पर्यायांच विचार करावा लागेल. कण्हेर जवळ जलसागर ढाब्याजवळच्या खाणीतील पाणी चांगले आहे. 12 फूटांच्या मूर्तीविसर्जनासाठी ही जागा अधिक योग्य आहे. साताऱ्यापासून 13 किलोमिटरवर हे ठिकाण आहे. मोठ्या मूर्ती मुख्य मिरवणूकीनंतर विसर्जनासाठी तिकडे न्याव्यात, असा प्रस्ताव पंकज देशमुख यांनी मंडळांना दिला. “”हुतात्मा स्मारक, सदरबझार दगडी शाळा व कल्याणी शाळेसमोरील कृत्रिम तलाव याठिकाणी घरगुती मूर्तींचे विसर्जन करता येईल. 10 फूटांपर्यंतच्या मूर्तींसाठी गोडोली तळे आणि पालिकेचा जलतरणतलाव हे पर्याय उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. 10 फूटांपेक्षा मोठ्या मूर्ती मात्र कण्हेरला न्याव्या लागतील.” असेही त्यांनी सांगितले.

उपस्थित सर्वच मंडळांनी कण्हेर येथे विसर्जनासाठी मूर्ती नेहणे अवघड असल्याचे सांगितले. अंतर जास्त आहे. मोठ्या मूर्तींसाठीच्या ट्रॉलींचा एवढ्या लांब प्रवासात निभाव लागणार नाही. विसर्जन मिरवणूकीनंतर मध्यरात्री तसेच पहाटेच्या वेळी कार्यकर्ते कंटाळलेले असतात. त्यानंतर 13 किलोमिटर अंतर मूर्ती नेणे सुरक्षेच्या दृष्टीने अडचणीचे ठरेल, असे मत पदाधिकाऱ्यांनी मांडले.

“मंगळवार तळ्याचे मालकच विसर्जनाला परवानगी देत असतील तर तुम्हीं का आडवता. केवळ 10 फूटांपेक्षा मोठ्या मूर्तींना मंगळवार तळ्यात परवानगी द्यावी, असा आग्रह पालिकेतील विरोधीपक्ष नेते अशोक मोने यांनी धरला. मिरवणूक मार्ग निश्‍चित झाल्यानंतर दोन दिवसांत मार्गातील झाडांच्या फांद्या छाटण्यात येतील. तसेच खड्डे भरुन दुरूस्ती करण्यात येईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी शहरातील विविध मंडळांचे अध्यक्ष,कार्यकर्ते उपस्थित होते.

दिलखुलास पोलिस अन टार्गेट मुख्याधिकारी
प्रशासनाने बोलवलेल्या या बैठकीत जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख व ते सभागृहात येण्यापुर्वी अप्पर अधीक्षक विजय पवार यांनी कोणताही आडपडदा न ठेवता मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे बैठकीतील वातावरण हलके फुलके झाले. मात्र सातारा पालीकेचे मुख्याधिकारी गोरे यांनी त्यांची कोणतीच भुमिका स्पष्ट न मांडल्याने ते कार्यकर्त्यांच्या टिकेचे धनी बनताना दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)