पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादामुळे आत्महत्या करणाऱ्यास मिळाले जीवदान

देहुरोड – मानसिक संतुलन बिघडलेल्या आणि आलेल्या नैराश्‍यातून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणाला वाचविण्यात देहुरोड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 10) सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्लीहून एका महिलेने फोन केला, रावेत मधील एका गृहसंकल्पातील फ्लॅटमध्ये एक तरुण गळफास घेऊन आत्महत्या करीत आहेत. पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ नियंत्रण कक्षातून देहुरोड पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली.

देहुरोड पोलिसांना माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरणाचे मनोज पवार, सहायक फौजदार सुभाष सावंत, पोलीस हवालदार प्रमोद सात्रस यांनी तात्काळ रावेत येथे धाव घेतली. संबंधित फ्लॅटचा दरवाजा बंद असल्याचे आढळून आले. बंद फ्लॅटमध्ये असणाऱ्या तरुणाला मन परिवर्तन करीत दरवाजा उघडण्याची पोलिसांनी विनंती केली. त्यानंतर त्याने काही वेळाने दरवाजा उघडला.

छताच्या पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याची तयारी केली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे आणि आलेल्या नैराश्‍यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे. रविवार असल्याने घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर होते. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधत तरुणाला त्यांच्या पालकांच्या सुखरूप स्वाधीन केले.

असा घडला प्रसंग…
तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी दिल्लीत असणाऱ्या बहिणीला फोन करून आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली होती. माहिती मिळतात संबंधित तरुणाच्या बहिणीने त्वरित पिंपरी-चिंचवड आयुक्‍तलय नियंत्रण कक्षाला कळविले. पोलीस आयुक्‍त आर. के. पद्वमनाभन, अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त मकरंद रानडे, पोलीस उपआयुक्‍त परिमंडळ दोनचे विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्‍त गणपतराव माडगुळकर आणि देहुरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पवार, सहायक फौजदार सावंत, पोलीस हवालदार सात्रस यांनी तत्पर हद्दीत घटनास्थळी पाचारण केल्याने मोठी दुर्घटना टळली. या तत्पर सेवेने तरुणाला जीवदान मिळाले. पोलिसांकडून तसेच परिसरातील नागरिकांकडून तत्परता आणि चांगल्या कार्यासाठी पोलिसांचे कौतूक वर्षाव होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)