पोलिसांच्या जीवाला पपड्याचा घोर!

कोपरगाव – कोपरगाव येथील कारागृहाची अवस्था आणि यापूर्वी तेथे कारागृह फोडून कैदी फरार होण्याचे झालेले प्रकार पाहता चार खून आणि अनेक दरोड्याचा सूत्रधार पपड्या उर्फ संजय उर्फ गणपती काळे याला तेथे ठेवल्याने पोलिसांनाच आता डोळ्यांत तेल घालून रक्षण करण्याची वेळ आली आहे. असुरक्षित कारागृहात त्याला ठेवल्याने पोलिसांच्या जीवाला घोर लागला आहे.
कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स सराफ संगमनेरकर यांच्या दुकानावरील दरोड्याचा पपड्या हा सूत्रधार आहे. तेथे केलेल्या गोळीबारात शाम धाडगे हा ठार झाला होता. दरोडयानंतर महिनाभराने पपड्याला साधूच्या वेशात असताना बुलडाणा येथून जेरबंद करण्यात आले. त्याला व त्याच्या पत्नीला न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे; मात्र महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश आदी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. अशा खतरनाक गुन्हेगाराला व त्याच्या टोळीला येथील दुय्यम कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या झोपा उडाल्या आहेत. आधीच या कारागृहाची अवस्था वाईट आहे. येथे क्षमेतेपेक्षा जादा कैदी येथे ठेवण्यात आले आहेत. या दरोडा प्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. पपड्याचे असलेले नक्षलवादी कनेक्‍शन व विविध राज्यात त्याने केलेल्या गुन्ह्याच्या पार्श्‍वभूमीवर त्याच्यावर पोलिसांची करडी नजर आहे.
कोपरगावच्या तहसील कार्यालयाने तसेच पोलिसांनी कारागृहाच्या दुरवस्थेबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. विशेष म्हणजे मानवाधिकार आयोगाने सरकारवर ठपका ठेवला, तरीही शासनाने काहीच दखल घेतली नाही. राहाता, शिर्डी, लोणी, कोपरगाव अशा पोलीस ठाण्यांचे आरोपी कोपरगाव येथे आणले जातात. काही वर्षापूर्वी संतोष वायकर टोळीतील काही खतरनाक आरोपींनी कारागृहाचे छत उचकटवून पलायन केले होते. तसेच कारागृहाची भिंत फोडून कैद्यांनी पलायन करण्याच्या घटना घडल्या आहेत. या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे. खतरनाक गुन्हेगारांची टोळी येथे असल्याने पोलिसांना खडा पहारा करावा लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)