पोलिसांचे सर्व काही “व्हेरी गुड’!

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना

नगर – महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस दलाकडून राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांच्यासमोर कारवयांच्या आकडेवारीचे सादरीकरण केले. आयुक्तांनी त्या आकडेवारीचे समर्थन करत “व्हेरी गुड’, असे उद्‌गार काढले. पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवल्यास नगरकरही “व्हेरी गुड’, असे म्हटल्याशिवाय राहणार नाही.
शहर पोलिसांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुंडप्रवृत्तींविरोधात कारवाईचा बडगा सुरू केला आहे.

जुगार, दारूबंदी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांना तडीपार व हद्दपार करणे, प्रतिबंधात्मक कारवाई, गस्त पथकांकडून कारवाई, भारतीय हत्यार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करणे, कोम्बिंग ऑपरेशन, अवैध पार्ट्यांवर नजर ठेवणे, समाज माध्यमांवरून शांतता भंग होईल असे संदेश देणाऱ्यांवर कारवाई करणे, अवैध दारू वाहतुकीसाठी नाकाबंदी करणे, हद्दपार झालेल्यांना शहरात प्रतिबंध करणे आदी कारवया सुरू झाल्या आहेत.

या सर्व कारवयांचे सादरीकरण जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त राजेश्‍वर सहारिया यांच्यासमोर केले. आयुक्त सहारिया यांनी देखील ही कारवाईची आकडेवारी पाहून “व्हेरी गुड’, असे उद्‌गार काढले.

रंजन कुमार शर्मा म्हणाले, “निवडणुकीच्या काळात समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेल अधिकच सक्षम करण्यात आला आहे. अनेक संदेशाचे फिल्टरेशन करण्यात येत आहे. जाहिरातीचे संकलन केले जात आहे. याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात येणार आहे.’ जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी देखील उमेदवारांकडून समाज माध्यमांवर होणाऱ्या जाहिराती किंवा लघुपटांची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या जाहिरातांची खर्च उमेदवारांच्या खर्चामध्ये समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


महापालिका निवडणुकीत शहरातील वातावरण शांततेत रहावे यासाठी शहर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. प्रभागनिहाय गस्तीपथके नेमण्यात आली आहे. रात्रीचे गस्तीपथक देखील कार्यरत आहेत. हे पथक अवैध दारूच्या वाहतुकीसह पार्ट्या, अवैध पैसा यावर लक्ष ठेवून आहेत. कारवाईचे संपूर्ण अधिकार पथकातील प्रमुखांना दिले आहे. हे पथके नियंत्रण कक्षाशी सतत संपर्कात राहून कारवाई करत आहेत.

– संदीप मिटके,
शहर पोलीस उपअधीक्षक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)