पोलिसांची “दुकाने’ बंद होणार का?

– संजय कडू

पुणे – शहरातील अवैध धंदे बंद करण्याची सूचना नवनियुक्त पोलीस आयुक्‍तांनी दिली आहे. त्याप्रमाणे बेकायदा हुक्का पार्लरवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. हे हुक्का पार्लर काही ठराविक पोलीस ठाण्यांच्याच हद्दीत आहेत. मात्र, शहरात हुक्‍का पार्लरपेक्षा इतर अवैध धंद्यांचे प्रमाण मोठे आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्याच आशीर्वादाने दोन नंबरचे धंदे राजरोजस सुरू आहेत. यामध्ये मटका, लॉटरी, क्‍लब तसेच देशी दारूचे अड्डे यांचे प्रमाण दखल घेण्याजोगे आहे. या धंद्यांना प्रत्येक पोलीस ठाण्याने अभय दिला आहे. या धंद्यांच्या माध्यमातून दरमहा सुमारे दोन कोटींचा हप्ता पोलीस आयुक्तालयात जात असल्याचा आरोपही नुकताच एका लोकप्रतिनधीने अधिवेशनात केला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलीस ठाण्याच्या हद्दतील अभय असलेल्या अवैध धंद्यांना पोलीस आयुक्त हात लावणार का? हा प्रश्‍न पुणेकरांकडून विचारला जात आहे.

-Ads-

या क्‍लब, जुगार अड्डे, देशी दारूचे बेकायदा अड्डे, लॉटरी सेंटरच्या माध्यमातून सर्वसामान्यांना देशोधडीला लावले जात आहे. अनेकांचे संसारही उद्‌ध्वस्त झाले आहेत. मात्र, पोलीस संरक्षणातच हे अड्डे सुरू असल्याने त्याविरोधात आवाज उठविण्याचीही कोणी हिंमत करत नाही. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच धमकावले जात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या परिसराप्रमाणे तेथील बेकायदा धंद्यांचेही प्रमाण वेगवेगळे आहे. मध्यवर्ती भागातही जुगार अड्डे व क्‍लबचे प्रमाण मोठे आहे. तर उपनगरांमध्ये लॉटरी सेंटर आणि काही लॉजवर चालणाऱ्या वेश्‍याव्यवसायाचे प्रमाण जास्त आहे. कल्याणीनगर, कोरेगाव पार्क आणि विमाननगर परिसरात स्पा तसेच पंचातारांकित हॉटेलच्या माध्यमातून सुरू असलेला हाय प्रोफाइल वेश्‍या व्यवसायदेखील दखल घेण्याजोगा आहे. यातही सर्वाधिक उलाढाल होणारे जुगार अड्डे घोरपडी, विश्रांतवाडी, मुंढवा, टिंगणेनगर, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, हिराबाग चौक, कोंढवा या ठिकाणी आहेत. यामुळे येथे पोलीस ठाण्यांचीही वरकमाई चांगली आहे. आजवर हे अड्डे राजकीय किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून चालवले जात होते. मात्र, शहरातील काही अड्ड्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचीच भागीदारी असल्याचे बोलले जाते. पोलीस आयुक्त कोणीही ऐवो या धंद्यांना मात्र हात लावला जात नाही. वर्षातून एखाद-दुसरी कारवाई फक्‍त दाखविण्यासाठी केली जाते.

फक्‍त आरंभशूरपणा नको
माजी पोलीस आयुक्तांनी सुत्रे हाती घेतल्यावर नवनियुक्त पोलीस आयुक्तांप्रमाणेच बेकायदा धंद्यांवर धडक कारवाई सुरू करून कामाचा प्रारंभ केला होता. ही कारवाई काही महिनेच सुरू राहिली. यानंतर दुप्पट वेगाने शहरात अवैध धंद्यांची सुरूवात झाली. या सर्व धंद्यांना पोलिसांचा अभय असल्यासारखेच ते सध्याही सुरू आहेत.

फरासखाना पोलीस ठाणे
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 26 लॉटरी सेंटर आहेत. यातील प्रमुख लॉटरी सेंटर बुधवार पेठ व फडके हौद चौकात आहेत. तर मटका क्‍लबची संख्याही दखल घेण्याजोगी आहे. कोंबडी पूल, तांबट हौद चौक, कुंभारवाडा, कडबा कुट्टी, दगडी नागोबा आदी परिसरात हे अड्डे आहेत. ही संख्या जवळपास 18 इतकी आहे.

विश्रामबाग पोलीस ठाणे
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुमकेठर रस्ता, सेनादत्त चौक, सदाशिव पेठ, गोटीराम भैय्या चौक, मंडई, कबीर बाग आदी परिसराजवळ लॉटरी व मटका सेंटर आहेत.

खडक पोलीस ठाणे
खडक पोलीस ठाण्याच्या क्‍लब व मटक्‍याचे सर्वाधिक प्रमाण आहे. नेहरू चौक, घोरपडी पेठ, कासेवाडी, राष्ट्रभूषण चौक, टिळक रस्ता, लोहियानगर, महात्मा फुले पेठ, काची आळी, गंज पेठ या परिसरांत तब्बल 24 अवैध धंदे सुरू आहेत.

कोथरूड पोलीस ठाणे 
कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत किनारा चौक, सुतार हॉस्पिटल परिसर, कर्वे रोड, पौड रोड आदी परिसरात मटका व क्‍लब आहेत. तर, यापाठोपाठ वारजे, शिवाजीनगर, स्वारगेट, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ सिंहगड आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक अवैध धंदे आहेत.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)