पोलिसांचा मित्र, तरीही बदलेना आर्थिक चित्र

होमगार्ड जवान दुर्लक्षितच : तुटपुंज्या मानधनासाठी खेटे कायम

– नाना साळुंके

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे- जनतेचा रक्षक आणि पोलिसांच्या खांद्याला खांदा लावत काम करणारा तसेच वेळप्रसंगी आपत्तीच्या घटनेच्या वेळी सर्वसामान्यांना मदत करणारा खाकी वर्दीतला माणूस म्हणजेच होमगार्डचा जवान. त्यामुळेच त्याला अल्पावधीतच लोकांच्या मनात जागा मिळाली. मात्र, राज्यकर्त्यांची उदासीनता आणि खात्यानेही दाखविलेली अडगळीची जागा यामुळे हा जवान विवचंनेत अडकला आहे. कडेकोट बंदोबस्त करुनही तब्बल तीन ते चार महिन्यांनी मिळणारे आणि ते देखील तुटपुंजे मानधन, त्यासाठी सततचे हेलपाटे यामुळे हा जवान चांगलाच त्रस्त झाला आहे.

रुबाबदार गणवेश आणि त्यावर स्टार, भारदस्त बूट तसेच टोपी. असा रुबाबदार पेहराव पाहून पोलीस असल्याचा भास होउन भल्याभल्यांनाही घाम फुटेल असा होमगार्डच्या जवानांचा दबदबा असतो. पोलिसांच्या ताफ्यात कुमक कमी असल्याने महत्त्वाच्या सणांसह आपत्ती तसेच दंगलीच्या ठिकाणी बंदोबस्ताचे काम होमगार्डच्या माध्यमातून चोखपणे करण्यात येते. त्यांच्या बंदोबस्ताची वेळ असते 12 ते 16 तासांची आणि त्यासाठी त्यांना मानधन मिळते ते अवघे 400 रुपयांचे. ते सुद्धा जेवणाच्या भत्त्यासह. बंदोबस्त असला, तरच हे मानधन मिळते. बंदोबस्तानंतरही मानधन मिळविण्यासाठी तीन ते चार महिन्यांची वाट पाहवी लागते. त्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात.

शहर आणि जिल्ह्यात अडीच हजार होमगार्डचे जवान आहेत. बंदोबस्तावेळी होमगार्ड जवानांची मागणी केली जाते. यानुसार उपलब्ध जवानांना त्या-त्या पोलीस ठाण्यांना पाठविण्यात येते. बंदोबस्त संपल्यानंतर संबंधित पोलीस ठाणे होमगार्ड कार्यालयाला त्याचे प्रमाणपत्र पाठविते. अवघ्या एक तासाच्या कामासाठी पोलीस ठाणे आणि विशेषत: सरकारी यंत्रणेला ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल अडीच ते तीन महिने लागतात. त्यामुळे बंदोबस्तासाठी तब्बल 12 ते 16 तास उभे राहूनही मानधनासाठी तीन ते चार महिने लागतात. केवळ बेरोजगारी या सर्व परिस्थितीला कारणीभूत असल्याने नाईलाजाने हा जवान दलदलीत अडकला आहे.

सरकारी अनास्थेचा खेळ
मानधन कमी असले, तरी पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक तरुण होमगार्ड दलाकडे वळाले आहेत. या दलात भरती होणाऱ्या जवानांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच उच्च शिक्षणाला लागणाऱ्या पैशांसाठीही काही तरुण याकडे वळाले आहेत. त्याशिवाय काही तरुण हौस म्हणूनही या पेशाकडे वळाले आहेत. पण, येथेही त्यांना सरकारी अनास्थेला तोंड द्यावे लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)