पोथीनिष्टांचा वरचढपणा मार्क्‍सवाद्यांसाठी घातक

लक्षवेधी

राहूल गोखले

भाजपला पराभूत करण्यासाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षात देखील खल चालू आहे. मार्क्‍सवाद्यांची भूमी हळूहळू आक्रसू लागली असताना देखील मार्क्‍सवाद्यांना अंतर्गत बेदिली मिटविता आलेली नाही. त्यामुळे भाजपशी लढत देताना विरोधकांच्या एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्यात अडसर निर्माण होण्यात होईलच; पण मार्क्‍सवाद्यांना आणखी राजकीय हानी सोसावी लागेल.

-Ads-

येत्या वर्षभरात अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि पुढचे वर्ष लोकसभा निवडणुकीचे असणार आहे. तेव्हा आता खरे तर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागणे अपेक्षित आहे. भाजप नेहमीच निवडणुकीच्या तयारीत असतो आणि भाजपला विरोध करणारे पक्षही शड्डू ठोकायला लागले आहेत. शिवसेनेने आपण स्वबळावर निवडणूक लढवू अशी गर्जना केली आहे.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीत सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आगामी निवडणुकीत भाजप हाच सर्वांत मोठा विरोधक आहे असे जाहीर करताना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी समझोता करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. “हा प्रस्ताव म्हणजे अंतिम निर्णय नव्हे; आणि पक्षाच्या अधिवेशनात अंतिम निर्णय घेतला जाईल,’ असे सांगितले जात असले तरी सामान्यतः अधिवेशनात केंद्रीय कार्यकारिणीतील कलच प्रतिबिंबित होत असतो. कार्यकारिणीत या प्रस्तावावर जेव्हा चर्चा आणि मतदान झाले तेव्हा माजी सरचिटणीस प्रकाश करात यांच्या समर्थकांनी तो प्रस्ताव हाणून पडला.

हा प्रस्ताव 55 विरुद्ध 31 मतांनी फेटाळण्यात आला. यामुळे निराश झालेले येचुरी यांनी आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली; परंतु त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांना तसे करण्यापासून परावृत्त केल्याने येचुरी यांनी तसा निर्णय घेतला नाही. तथापि, मार्क्‍सवादी पक्षात सारे काही आलबेल नाही याचे हे द्योतक आहे. अर्थात डाव्यांनी याअगोदर देखील अशा गफलती केल्या आहेत. त्यातील अलीकडची गफलत म्हणजे येचुरी यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी न देण्याची. येचुरी यांच्याइतका समर्थ खासदार मार्क्‍सवादी पक्षाकडे नाही. परंतु पक्षाने नियमांकडे बोट दाखवीत येचुरी यांना रोखले. वरवर पाहता व्यक्‍तिपूजेच्या काळात पक्षनिष्ठा महत्त्वाची ठरते हे उल्लेखनीय. तथापि पक्षनिष्ठेला तारतम्याची जोड आवश्‍यक असते.

आताही येचुरी यांच्या कॉंग्रेसशी समझोता करण्याच्या प्रस्तावाला विरोध करताना जो युक्‍तिवाद करात गटाकडून करण्यात येत आहे तो असा की कॉंग्रेस आणि भाजप यांच्या राजकीय चारित्र्यात फारसा फरक नाही नि त्यामुळे कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्यात फारसे हशील नाही. हा युक्‍तिवाद अगदीच चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. किंबहुना कॉंग्रेसची वाटचाल सौम्य हिंदुत्वाकडे सुरू असताना हा युक्‍तिवाद अधिकच संयुक्‍तिक ठरतो. मात्र तरीही कॉंग्रेसशी लढताना भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडी तयार करताना कॉंग्रेस आणि आघाडीतील पक्ष यांच्यात राजकीय चारित्र्य काय ते पाहिले नव्हते; कारण प्रधान उद्देश होता तो कॉंग्रेसला पराभूत करण्याचा. तेव्हा मग तृणमूलसारखे पक्षही एनडीएमध्ये सामील झाले होते.

याला संधिसाधूपणाचे राजकारण म्हणता येईल किंवा व्यावहारिक राजकारण म्हणता येईल. परंतु जेव्हा प्रबळांना पराभूत करायचे असते तेव्हा तोच समान धागा पकडून इतरांना एकत्र यावेच लागते. मार्क्‍सवाद्यांच्या पोथीनिष्ठपणाला कदाचित हे मान्य होत नसेल. मात्र या हटवादीपणामुळे मार्क्‍सवादी आणि एकूणच डावे पक्ष यांची अवस्था किती केविलवाणी झाली आहे हे दिसते आहे.

1957 मध्ये म्हणजे साठ वर्षांपूर्वी डाव्यांची केरळमधील सत्तेच्या रूपाने पहिल्यांदा सत्ता आली. त्यानंतर आता देखील त्रिपुरा आणि केरळ येथेच डाव्यांची सत्ता आहे आणि देशभर डाव्यांचा राजकीय विस्तार फारसा होऊ शकला नाही. बंगालमधील सत्तेला तृणमूलने सुरुंग लावला. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी हातमिळवणी करूनही तृणमूलच्या झंझावाताला रोखणे डाव्यांना शक्‍य झाले नाही आणि भाजपची चढती कमानही थांबविता आली नाही.

किंबहुना बंगालात आता तृणमूलला कॉंग्रेस जवळची वाटायला लागली तर डाव्यांची स्थिती अधिकच केविलवाणी होईल ही भीती आहे. वास्तविक विश्‍वनाथ प्रताप सिंग सरकारला डाव्यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता तेव्हा भाजपनेदेखील सिंग सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. तेव्हा दोन परस्परविरोधी विचारधारांवर आधारित पक्षांच्या पाठिंब्यावर सिंग सरकार सत्तेत आले. नंतर यूपीए सरकारला डाव्यांनी केंद्रात पाठिंबा दिला होता.

अणुकरारासंबंधी प्रश्नावर डाव्यांनी आततायीपणा केला नसता तर कदाचित डावे-कॉंग्रेस संबंध सुरळीत राहिले असते. परंतु येथे उल्लेखनीय भाग हा की 1990 च्या दशकात कॉंग्रेसविरोधात लढणाऱ्या राष्ट्रीय मोर्चा सरकारला बाहेरून पाठिंबा देताना डाव्यांना संकोच वाटला नव्हता आणि 2004 मध्ये कॉंग्रेस सरकारला पाठिंबा डाव्यांनी बिनदिक्कत दिला होता. याचे कारण असे की दोन्ही वेळच्या राजकीय परिस्थिती भिन्न होत्या. तेंव्हा आता भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याचा येचुरी यांचा प्रस्ताव कालोचित आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. तरीही करात आडमुठेपणा करत आहेत याचे एक कारण म्हणजे पोथीनिष्ठपणा हेच होय.

ज्योती बसू यांना पंतप्रधान बनण्यापासून डाव्यांमधील पोथीनिष्ठानीच रोखले होते आणि अणुकरारावर कॉंग्रेसशी संबंध तोडण्यासही या पोथीनिष्ठानीच भाग पाडले होते. परंतु या पोथीनिष्ठपणाचा लाभ डाव्या पक्षांपेक्षा विरोधी पक्षांनाच अधिक होत आहे आणि होईल याचे भान या मुखंडांना राहिलेले नाही. डावे आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांची स्थिती तशी क्षीण आहे. तेंव्हा त्यांनी एकत्रित निवडणुका लढविण्याने मतांवर वा जागा जिंकण्यावर किती परिणाम होईल हे सांगता येणार नाही. मात्र, वातावरणाचा एक परिणाम असतो आणि त्याचा तरी लाभ उठविण्याची संधी डाव्यांना होती. करात गटाने ती शक्‍यताच मोडकळीस काढली आहे असे म्हटले पाहिजे.

मार्क्‍सवादी पक्षातील हा संघर्ष असलाच तर तो कदाचित पोथीनिष्ठ आणि व्यावहारिक राजकरण करू पाहणाऱ्यांमधील आहे आणि बहुधा तो व्यक्तक्‍तीच्या अहंकाराचा संघर्ष आहे. त्यास तात्त्विक मुलामा दिला की सर्वांनाच सोयीचे ठरत असते. मार्क्‍सवादी पक्षाची चिंताजनक परिस्थिती पाहता संधिसाधूपणा न करता आणि वैचारिक तडजोड न करताही पक्षविस्तारासाठी समविचारी पक्षांशी हातमिळवणी करणे उपयुक्त ठरू शकते. पण एकही पक्ष आपल्या समविचारी नाही हा एककल्लीपणा देखील अहंकारातूनच येत असतो- मग तो अहंकार वैयक्‍तिक असो की पक्षीय. याचे परिणाम दोन संभवतात- एक, येचुरी यांनी पायउतार होऊन नव्या व्यक्‍तीला सरचिटणीस करणे आणि दुसरा परिणाम म्हणजे मार्क्‍सवादी पक्षाचा अधिकाधिक संकोच होणे. यातील पहिला परिणाम कदाचित पक्षाला पचविता येईलही; पण दुसऱ्या परिणामाची किंमत मोठी असेल यात शंका नाही.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)