पोटातून काढली तब्बल दहा किलोंची गाठ

देशातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा दावा ःमंचर उपजिल्हा रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

केक कापून अनुला पुढील आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

मंचर – आदिवासी भिल्ल समाजाच्या अनू गजू माळी या 15 वर्षीय मुलीच्या पोटातून तब्बल दहा किलो वजनाची हेरा टोमा नावाची गाठ मंचर उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय पथकाने काढून तिला जीवदान दिले आहे. तिच्या पोटाचा पुढील भाग सुमारे दीड फूट कापून ही गाठ काढण्यात आली. संबंधित मुलीच्या शरीरातील सर्व अवयव प्रचंड अशा गाठीला चिकटलेल्या अवस्थेत होते. त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. एवढ्या मोठ्या आकाराच्या गाठीची भारतातील पहिली शस्त्रक्रिया तसेच जगात आत्तापर्यंत अशा तीन ते चार शस्त्रक्रिया झाल्याचा दावा येथील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्‍त केला. शुक्रवारी (दि. 23) सकाळी मंचर उपजिल्हा रूग्णालयात दहा किलो गाठीच्या वजनाएवढा केक केक कापून अनुला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अनू हिला याअगोदर नाशिक येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेल्यावर सुमारे 20 ते 25 लाख रूपये खर्च येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे तिचे पालक दुर्बल आर्थिक परिस्थितीमुळे चिंताग्रस्त होते. तर अनूची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. अनू ही आई-वडिलांसह कळंब (ता. आंबेगाव) येथे सभापती उषा कानडे आणि भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी मागील दोन वर्षांपासून वास्तव्याला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांनी मंचर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. तसेच जास्त खर्च येणार नसल्याचाही कुटुंबियांना धीर दिला.

सविस्तर माहिती अशी की, अनू हिला आई अनुसया यांनी मंचरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तेथे रिपोर्ट पाहून अनूला इतर मोठ्या रुग्णालयात उपचारास नेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी अनूच्या आईला अश्रू अनावर झाले. अनुसया यांनी डॉक्‍टरांना किती दवाखाने फिरल्याची सत्य परिस्थिती सांगितली. त्यामुळे डॉ. अंबादास देवमाने आणि डॉ. गणेश पवार हे दोघेही स्तब्ध झाले. त्याचवेळी मुलीच्या अनुसया यांनी मुलीला कोठेही घेऊन जाणार नाही. तुम्हीच तिच्यावर उपचार करा, वाचली तर तिचे नशिब…असे म्हणताच डॉक्‍टरांना ही राहावले नाही. तेव्हा डॉ. पवार यांनी डॉ. देवमाने यांना विचारले, सर तुम्ही ऑपरेशन करू शकाल? डॉ. देवमाने यांनी क्षणाचाही विलंब न लावता होय असे उत्तर दिले. हो, पण तपासण्यांची आवश्‍यकता आहे. डॉ. पवार यांनी सर्वतोपरी मदत करण्याची हमी दिली. त्यापुढे वैद्यकीय अधिक्षिका डॉ. सीमा देशमुख यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. त्यांची परवानगी महत्त्वाची होती. रूग्णसेवेत तत्पर असलेल्या डॉ. देशमुख यांनी ही परवानगी दिली. रूग्णांस दाखल करण्यात आले.

डॉ. पवार यांनी रूग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून तपासण्या उपलब्ध करून दिल्या. औषधांची जबाबदारी डॉ. देशमुख यांनी स्वीकारली. डॉ. सदानंद राऊत यांना फिटनेससाठी बोलविण्यात आले. डॉ. देवमाने हे शस्त्रक्रियेच्या पूर्वतयारीला लागले. डॉ. पी. एस. करमरकर, पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजचे डॉ. पी. व्ही. रनबागले यांचे मार्गदर्शन घेतले. डॉ. राऊत यांनी शस्त्रक्रियेस हिरवा कंदिल दिला. त्यानंतर डॉ. संजयकुमार भवारी, स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. वृषाली जाधव स्त्रीरोग तज्ज्ञांना मदतीला घेतले.
उपजिल्हा रूग्णालयातील भूलतज्ज्ञांनी रूग्णांची तपासणी केली. डॉ. चंदाराणी पाटील, डॉ. वृषाली इमेकर व डॉ. मनिष मोरे भूल देण्यासाठी सज्ज झाले. दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता शस्त्रकियेची वेळ निश्‍चित करण्यात आली. मध्यंतरीच्या काळात अनू माळी ही मुलगी उपजिल्हा रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या गळयातील ताईत बावर काळजी होती. दिलीप करवंदे, संजय सोमवंशी पाटील हे औषधांची कमी पडू नये याची काळजी घेत होते. शस्त्रक्रिया सुरू झाली. तहान भूक हरपून सर्वजण शस्त्रक्रियेत गुंतले होते. खूप वेळ झाला होता. शेवटी डॉ. देवमाने यांनी अनूच्या शरीरातून 9.670 किलोचा गोळा बाजूला केला. भूलतज्ज्ञांनी अत्यंत शिताफीने हा क्षण सांभाळला. अन्‌ डॉ. देवमाने यांच्या डोळ्यात शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची चमक दिसली. परंतु हे इथेच थांबणार नव्हते. अनूची शस्त्रक्रिया भूल संपल्यानंतर स्वतःचा श्‍वास घेतल्यावर संपणार होती. तब्बल नऊ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर अनूला नवीन जीवन देण्यात यश मिळाले.

डॉ. देवमाने, डॉ. मनिष मोरे डोळ्यात तेल घालून तिची काळजी घेत होते. डॉ. महेश गुडे, डॉ. कैलास भागवत, डॉ. चंदाराणी पाटील, डॉ. संदीप पाटील, मोहिणी वळवी, पूनम दिघे, कविता पवार, आशा पांडूरंग कानवडे, सविता अरूण कातळे तासातासाला रात्रं-दिवस तिची तपासणी व काळजी घेत होत्या. शस्त्रक्रियेच्या जखमा भरून आज ती बोलायला, चालायला लागली. तिच्या नवीन आयुष्याची सुरूवात झाली. तिला नवे आयुष्य मिळाले. त्यामुळे उपजिल्हा रूग्णालयाच्या संपूर्ण टीमचे जनमानसातून कौतुक होत आहे.

केक कापण्याच्या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी राहुल काळभोर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत, रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. सीमा देशमुख, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य डी. के. वळसे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, इतर कर्मचारी यांचे सत्कार गटविकास अधिकारी राहुल काळभोर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. सीमा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. देवमाने यांनी चित्तथरारक अनुभव सांगितले. प्रास्ताविक डॉ. पवार यांनी केले. तर डॉ. संजयकुमार भवारी यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)