पोटाचा घेर कमी करण्यासाठी करावयाची सप्तासने

1) कंबर खाली-वर करत तडागासन
आधीे पाठीवर झोपावे. सीट जमिनीला टेकवून दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून आरामात उभे करावेत. पायांना कोणताही ताण घेऊ नये.तसेच दोन्ही हात डोक्‍यापाशी रिलॅक्‍समध्ये ठेवावेत. श्‍वास घ्यावा कंबर उचलावी. श्‍वास सोडावा कंबर टेकवावी. परत सीट उचलून परत टेकवावे. असे 15 ते 20 वेळा करावे. अशा प्रकारे वरील चित्राप्रमाणे स्थिती घेऊन आपण कंबरेला आणि पोटाला व्यायाम देतो.कंबर सतत वर उचलून परत खाली टेकवतो मात्र ती न आपटता अलगद उचलावी आणि टेकवावी आणि टेकवावी यामुळे कंबरेवरची चरबी कमी व्हायला मदत होते.
2) बैठक स्थितीतील तौलांकोनासन
एका बेंचवर बसावे. दोन्ही हाताने बेंच घट्ट पकडावा. गुडघे छातीपर्यंत उचलण्याचा चित्रात दाखविल्याप्रमाणे प्रयत्न करावा. पाय जमिनीला टेकवू नयेत. असे 15 ते 20 वेळा करावे. यामुळे शरीर ताणले जाते. विशेषत: कंबर आणि पोटावर ताण येतो. त्यामुळे कंबरेच्या चरबीत घट होते आणि पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते.
3) बैठक स्थितीतील कैचीपादासन
एका बेंचच्या कोपऱ्यात बसावे. दोन्ही हाताने शरीर संतुलीत ठेवून बेंच पकडावा. त्यावेळी दोन्ही पाय फाकवून रिलॅक्‍समध्ये थोडे मागे झुकावे. जोरात श्‍वास घेऊन पोट आत घ्यावे. त्याचवेळी जोरात खेचून दोन्ही पाय कात्रीसारखे तिरके ताणावेत. मग श्‍वास सोडून ताणलेले पाय सोडावेत. असे 15 ते 20 वेळा करावे. यामुळे कंबरेला ताण येतो व कंबरेची गोलाई कमी होते.
4)बैठक स्थितीतील दंडत्रिकोणासन
एक हलकी काठी किंवा लाकडी पोकळ दंड घेऊन डोक्‍याच्या मागे तिरकी घ्यावी. मान थोडीशी झुकवून शरीराला ताण द्यावा. काठीची टोके हाताने पकडून मानेपासून ते पोट, कंबर ताणावे. थोडक्‍यात श्‍वास घेत हलक्‍या हाताने काठीसकट शरीराला ताण द्यावा. एकदा डावीकडून झुकावे व ताण द्यावा तर एकदा उजवीकडून असे 15 ते 20 वेळा करावे.
5)शयनस्थितीतील द्विपाद काटकोनासन
नेहमीप्रमाणे शयनस्थिती घ्यावी. पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून स्टुलावर ठेवावेत. पाय दुमडताना ते काटकोनात दुमडून स्टुलापाशी चिकटवावेत. मग श्‍वास घेत घेत सावकाश शरीराचा वरचा भाग हळू हळू वर न्यावा परत पहिल्या स्थितीत पाय स्टुलाजवळ चिकटवावेत. स्टुल लाकडी घ्यावे म्हणजे ते अंगावर पडणार नाही. तसेच हलणारही नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे 20-25 वेळा करावे. यामध्ये कमरेला चांगल्या प्रकारे व्यायाम होतो व अतिरिक्‍त चरबी घटण्यास मदत होते.
6)शयनस्थितीतील एकांगासन
आधी शयनस्थिती घ्यावी. दोन्ही हात डोक्‍याखाली ठेवावेत. दोन्ही गुडघे एका बाजूला न्यावेत. म्हणजे एकांगासनाची स्थिती घ्यावी आणि शरीराचा वरचा भाग उचलण्याचा सावकाश प्रयत्न करावा.
डाव्या आणि उजव्या बाजूने ही क्रिया 15 ते 20 वेळा करावी. यामुळे कंबरेवर ताण येतो. एका बाजूला कंबर झुकवल्यामुळे दाब येतो. त्यामुळे तेथील स्नायूंची हालचाल वाढते व कंबरेची चरबी कमी व्हायला मदत होते.
7) विपरित शयनस्थितीतील कटीआसन
प्रथम विपरित शयनस्थिती घ्यावी. दोन्ही हात एकमेकात गुंफून चित्रात दाखवल्याप्रमाणे डोक्‍यावर ठेवावेत. श्‍वास घेत घेत मान वर उचलावी. तसेच शरीर जास्तीत जास्त उचलण्याचा प्रयत्न करावा. गुडघे, मांड्या जमिनीला टेकलेले असावे आणि पायाची नखे जमिनीला लोळलेली असावेत असे 10 ते 15 वेळा केल्यानंतर शरीर सैल सोडावे. या आसनामुळे कंबरेला ताण येतो. कंबरदुखी थांबते तसेच कंबरेवरील अतिरिक्‍त मांसल भाग कमी होण्यास मदत होते.
अशा प्रकारे वरील अशी विशिष्ट आणि विविध स्थितीतील खास कंबरेसाठी वरील सप्तासने तज्ज्ञयोगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावीत म्हणजे कंबरेचे विकार बरे होतील त्याचबरोबर कंबरेची चरबी कमी होण्यास वरील आसने सातत्याने करणे फायद्याचे ठरेल.

मूत्रविकार बरे करणारे -जानुशिरासन
जानुशिरासन हे एक बैठक स्थितीतील आसन आहे. जानू म्हणजे गुडघा. जसा पश्‍चिमोत्तासनात गुडघा आणि डोक्‍याचा संबंध येतो तसाच जानुशिरासनामध्ये येतो. प्रथम बैठक स्थितीत बसावे. डाव्या पायाची टाच गुद्दद्वारापाशी दाबून ठेवावी. उजवा पाय लांब व सरळ ठेवावा. दोन्ही हातांनी उजव्या पायाचा चवडा पकडावा. श्‍वास सोडत पोट आतल्या बाजूला खेचत डोके हळू हळू खाली वाकवावे. तोंड आणि हनुवटी गुडघ्यावर टेकवण्याचा प्रयत्न करावा. हे आसन पूर्ण झाल्यावर कुंभकस्थितीत राहावे आणि मग हळू हळू श्‍वास घेत वर यावे. पाच ते दहा सेकंदापर्यंत टिकवता येते. वर येताना कुंभक सोडून पूरक आणि रेचक करावे.
मुत्रेंद्रिंय आणि गुदद्वार यांना या आसनाचा विशेष फायदा होतो. डावा पाय लांब करूनही हे आसन करता येते. रोज नियमित सराव केल्यास अर्धा तासही हे आसन टिकवता येते. पण प्रत्येकाला ते शक्‍य नाही म्हणून शक्‍यतो हे आसन शौचानंतर करावे. जानुशिरासन उत्तम जमल्यास पश्‍चिमोत्तासन सहज जमते. दिवसातून पाच सहा वेळा करावे. खोकला, दमा, ताप यासारखे विकार या आसनाने दूर होतात. आयुष्य वाढते, कुंडलिनी शक्‍ती जागृत होते, मुत्रविकार बरे होतात, मुख्य म्हणजे शरीरातील आळस निघून जातो, तसेच दुर्बलता कमी होऊन शक्‍ती वाढते. पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात. जर पोटात कळ येत असेल तर ती नाहीशी होते. जानु शिरासनामुळे पश्‍चिमात्तोसनाचे फायदे तर मिळतातच शिवाय शरीर सशक्‍त बनते. स्त्रियांचे योनीचे रोग बरे होतात. तसेच काम जागृतीसाठी हे आसन फार पूर्वी केले जात असे. एकंदर या आसनामुळे स्त्रियांची कामवासना जागृत होते. वंधत्वाचे प्रश्‍न सुटतात म्हणून स्त्रियांनी हे आसन नियमित करावे. जठराग्नी प्रदीप्त होतो आणि पचनक्रिया सुधारते. पुरुषांनीही हे आसन रोज करावे. त्यामुळे त्यांचे लिंगाचे प्राब्लेम सुटतात, शरीरात इतरत्र कुठे गाठ येऊन त्रास होत नाही.
तरुणांनी हे आसन नियमित करावे. त्यामुळे ब्रह्मचर्यपालनास मदत होते. फक्‍त ज्यांचे गुडघ्याचे अथवा पोटाचे ऑपरेशन झाले असेल त्यांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करू नये.
करपट ढेकरा येत असतील तर हे आसन जरूर करावे. या आसनाच्या नियमित सरावाने करपट ढेकरा तर थांबतातच शिवाय आतड्याचे रोगही बरे होतात. ऍसिडिटी बरी करण्यासाठी जानुशिरासन जरूर करावे. अपानवायू किंवा गॅसेस सुटत असतील तर जानुशिरासन केल्यामुळे गॅसेसचा प्राब्लेम मिटतो. गुद भगंदरासारखा असाध्य रोग टाळण्यासाठी जानुशिरासन रोज करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)