पोटच्या मुलाला वाचविताना मायलेकाचा बुडून मृत्यू

कोल्हापूर – कोल्हापुरातल्या शिये (ता. करवीर) येथील क्रशर खणीमध्ये कपडे धुण्यास गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पाण्यात बुडणाऱ्या पोटच्या मुलाला वाचविताना घडली.
सविता आप्पासाहेब निलगिरे (वय 24, रा. शिये), त्यांचा मुलगा सोनू (वय 4) अशी मृतांची नावे आहेत. अधिक माहिती अशी, सविता निलगिरे यांचे मूळ गाव करजगा (ता. हुक्केरी, जि. बेळगाव) आहे. त्या कुटुंबासह शिये येथे राहत होत्या. त्यांचा दीर बापू मारुती निलगिरे हा विठ्ठल पाटील यांच्या शिये येथील क्रशरवर मजुरीची कामे करतो. त्याचे दि. 18 जून रोजी लग्न असल्याने दोन दिवसांपूर्वी सविता पती व मुलासोबत शिये येथील दिराच्या घरी आल्या होत्या.

सोमवारी सर्वजण जथ्था काढण्यासाठी जाणार होते. शनिवारी सकाळी त्या मुलगा सोनू याला घेऊन कपडे धुण्यासाठी शेजारीच असलेल्या खणीमध्ये गेल्या. खणीवर अन्य महिलाही धुण्यासाठी आल्या होत्या. सविता धुणे धूत असताना मुलगा सोनू खणीजवळ खेळत होता. तो पाण्यात उतरून आतमध्ये गेला. अचानक खोल पात्रात पडल्याने तो बुडू लागला. यावेळी खणीवरील महिलांनी आरडाओरड केली. पोटचा गोळा बुडत असल्याचे पाहून सविता त्याला बाहेर काढण्यासाठी पाण्यात गेल्या. त्यांना पोहता येत नसल्याने मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याही बुडाल्या.

खणीवरील आरडाओरडा ऐकून क्रशरवर काम करणारा मजूर बाळकृष्ण आप्पासाहेब सनदी धावत आला. त्याने पाण्यात उडी घेत सोनूला बाहेर काढले. त्याचा श्वास सुरू असल्याचे लक्षात येताच खासगी वाहनातून त्याला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानंतर खणीत बुडालेल्या सविता यांचा मृतदेह बाहेर काढून “सीपीआर’च्या शवगृहात आणला. या ठिकाणी पतीसह नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)