पोटखराब जमिनींची नोंद लागवडीच्या वाटेवर

राज्यातील महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा : लाखो हेक्‍टर जमीनी लागवडीखाली येणार

पुणे – पोटखराब जमिनीमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांनी हे क्षेत्र लागवडीखाली आणले आहे. मात्र, याची नोंद सातबारा उताऱ्यावर लागवडी योग्य क्षेत्र, अशी होत नसल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या विविध लाभांपासून वंचित रहावे लागत होते. तसेच शासनाचाही शेतसारा बुडत होता. त्यानुसार आता पोटखराब वर्गातील जमिनी लागवडीयोग्य केल्या असतील तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर लागवडीलायक क्षेत्र अशी होणार आहे. याविषयीचा अधिनियम शासनाने जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज, पीक विमा आदी सुविधा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो हेक्‍टर जमिनींची नोंद लागवडी योग्य क्षेत्र, अशी होणार आहे.

सद्यस्थितीत पोटखराब म्हणून नोंद असलेले क्षेत्र शेतकऱ्यास लागवडीखाली आणता येते. परंतू त्यावर महसूली आकारणी करता येत नाही. जमिनीवर पिके घेतली जात असेल तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर लागवडीखाली क्षेत्र अशी घेतली जाते. तसेच ती जमिन डोंगर उताऱ्यावर किंवा खडकाळ असेल तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर पोटखराब क्षेत्र अशी केली जाते. लागवडी योग्य असलेल्या क्षेत्रानुसारच शेतसारा आकारण्यात येतो. राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी असे पोटखराब क्षेत्रामध्ये सुधारणा करून ते क्षेत्र लागवडीयोग्य आणले आहे. मात्र, याची नोंद सातबारा उताऱ्यावर पोटखराब क्षेत्र अशीच राहते. त्यामुळे यामध्ये बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

त्यानुसार जमाबंदी आयुक्‍त कार्यालयाने याविषयीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. शासनाने महाराष्ट्र जमिन महसूल कायद्यामध्ये बदल केला आहे. तसेच याविषची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

याविषयी माहिती देताना ई- फेरफार प्रकल्पाचे समन्वयक, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले की, शासनाने महाराष्ट्र जमिन महसूल नियम (जमिन वापरावर निर्बंध) यामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार प्रचलित नियमाप्रमाणे जमीनधारकाने पोटखराब वर्ग (अ) खाली जमिन लागवडीखाली आणली तर त्यावर कोणतीही आकारणी करता येत नव्हती. या सुधारणामुळे पोटखराब वर्ग (अ) खाली येणारी जमीनधारकास लागवडीखाली आणता येईल. तसेच त्यावर लागवडीखाली क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात अतिरिक्‍त आकारणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पोटखराब क्षेत्र लागवडीयोग्य केले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना या सुधारणेमुळे पीककर्ज, नुकसान भरपाईचा योग्य मोबदला मिळणे शक्‍य होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पोटखराब क्षेत्र म्हणजे काय?
इंग्रजांनी 1919-20 या वर्षात जमिनीची मोजणी केली. त्यावेळी जमिनीचा जसा वापर केला जात होता. तशी नोंद सातबारा उताऱ्यावर केली आहे. जितक्‍या क्षेत्रावर लागवड केली आहे. ते क्षेत्र लागवडीखाली, असे सातबारा उताऱ्यावर नोंदविण्यात आले. तर ज्या क्षेत्रावर पिके घेतली नाही, असे क्षेत्र हे पोटखराब म्हणून नोंदविण्यात आले. पोटखराब नोंदीचेही दोन प्रकार आहे. पोटखराब (अ) म्हणजे हे क्षेत्र जर डोंगर उतारावर, खडकाळ अशी ठिकाणी आहे. मात्र, भविष्यात लागवडीयोग्य असे क्षेत्र होऊ शकते. ते क्षेत्र. तर पोटखराब (ब) क्षेत्र म्हणजे रस्ते, कोंडवाडा, खळवाडी आदी वापरासाठी असलेले क्षेत्र जे लागवडी योग्य करता येत नाही असे क्षेत्र.

पोटखराब क्षेत्राची लागवडी योग्य क्षेत्र, अशी नोंद झाली तर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळू शकते. तसेच पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे होणाऱ्या नुकसान भरपाईचा मोबदलाही मिळणे शक्‍य होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)