पैसा व आरोग्यही सांभाळा (अग्रलेख)

ज्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत त्या सध्या न्यायालयाला कराव्या लागत आहेत. ज्या गोष्टी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन थांबवल्या पाहिजेत, तेथेही न्यायालयाला लक्ष घालावे लागते आहे. जेथे जनजागृती करून विषय संपवता येण्यासारखा आहे, तेथे कायद्याचा दंडुका दाखवावा लागतोय. सगळेच जर न्यायालयाने करायचे असेल तर इतर व्यवस्थेची गरजच काय? मात्र, त्याचेही कोणाला सोयरसुतक नाही. कारण प्रत्येक गोष्टीत आपल्याला हवे तेवढेच आणि हवे तेच संदर्भ घ्यायचे व आपल्या सोईनुसार त्याचा अर्थ लावायचा हा स्वभावधर्म झाला आहे. कोणीतरी वाईटपणा घेतल्याशिवाय त्यात तसूभरही फरक पडत नाही. तो वाईटपणा आता न्यायालयाला धर्म-सण- उत्सव अशा श्रद्धेच्या सर्वच बाबतींत घ्यावा लागतो आहे.

दहीहंडी, शबरीमला ही अलीकडच्या काळातील त्याची ठळक उदाहरणे. त्यात आता फटाक्‍यांची भर पडली आहे. दिवाळीत फटाक्‍यांच्या विक्रीवर सरसकट बंदी घालण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र फटाके फोडण्यावर काही बंधने घातली आहेत. रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडले जावेत, असे ताज्या निकालात स्पष्ट करण्यात आले आहे. आता हे वेळापत्रक पाळले जाणार का? तसे जर होणार नसेल तर त्यावर बंधन कोणी आणि कसे घालायचे? फटाक्‍याची दारू ही घातकच असते. त्यामुळे शरीराला आणि पर्यावरणाला हानी होतच असते. जागतिक तापमानवाढ या विषयावर गेल्या दशकभरापासून सातत्याने सांगितले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्यावरणवादी मंडळी त्याबद्दल जनजागृती करतच आहेत. ही मंडळी जे सांगत आहेत, त्यात चुकीचे काही नाही, हे सूज्ञांना समजते. मात्र, आम्ही आमचे सणही साजरे करायचे नाहीत का, असा सवाल केला जातो. आमच्याच सणांच्या वेळी एवढ्या आचारसंहिता आणि निर्बंध का, असे विषयाला फाटे फोडत वेगळे वळण देण्याचाही प्रयत्न असतो. मात्र, प्रश्‍न जर आनंद साजरा करण्याचाच असेल तर स्वत:सह इतरांना कोणताही त्रास व इजा न पोहोचवताही तो साजरा करता येतोच की! त्यासाठी इतरांना वेठीस धरले जाणार असेल, तर तो आनंद आहे की विकृती याचाही विचार करायला हवा. न्यायालयाने गेल्या वेळीही तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीवर बंदी आणली होती. ती कितपत पाळली गेली? फटाक्‍यांच्या आवाजाचे प्रमाण कितपत कमी झाले? दिवाळीच्या काळात मुहूर्त पाहून घरोघरी पुजा केल्या जातात. त्यानंतरच धमाके सुरू होतात. ते उत्तररात्रीपर्यंत चालतात.

नरकासुराचा वध होण्याच्या अगोदरही व नंतरही फटाके फोडले जातात. या फोडाफोडीत आपलाच आवाज सगळ्यांत जास्त आणि मोठा हा प्रतिष्ठेचा मुद्दा असतो. त्याकरता किती नोटा जाळल्या, याची फिकीर करायलाही सवड नसते. भारतात किती कोटी लोकांना उपाशीपोटी झोपावे लागते. त्यांची चूल पेटत नाही. मात्र, त्यापेक्षाही कैक पटीने जास्त तेल मंदिरात वाहिले जाते व दिवे पेटवले जातात. पण पूर्वी जे केले किंवा आम्ही पूर्वीपासून जे करत आहोत, तेच बरोबर आहे, असेच मानणार असाल तर बदलत्या जगाची व तेथल्या वातावरणाची तुम्हाला मुळीच जाण नाही व त्याबाबत तुम्ही निरक्षरच आहात, हा संदेश तुम्ही फोडलेल्या फटाक्‍यांच्या आवाजापेक्षा कैकपटीने मोठा असेल. लोकानुनय आणि लोकभावनांचा आदर या सबबीखाली चुकीच्या बाबींकडे डोळेझाक करण्याचा प्रकार केला जातो.

समाजाला शहाणपण शिकवण्याची ज्यांच्याकडे जबाबदारी असते तेच लोक कान बंद करून बसत असतील तर फटाक्‍यांचा आवाज “म्युट’ होणार कसा? एकीकडे वसुधैवकुटुंबकम्‌च्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे गल्ली-कॉलनीतील वृध्द, अस्थमा व श्‍वसनाचे विकार असणारे रूग्ण यांचा विचार न करता, आपला आनंद दणदणाट करूनच साजरा करण्याचा बेफिकीरपणा दाखवायचा. आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या पीएम-10 या घटकाचे हवेतील प्रमाण सातत्याने वाढत आहे. हे वाढते प्रमाण विविध आजारांना निमंत्रण देणारेच ठरत आहे. दिवाळीच्या आतषबाजीत अर्थातच याचे प्रमाण वाढणार आहे. ते कोणाच्या मुळावर उठणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तथापि, हे सगळे आता बदलण्याची गरज आहे.

फटाक्‍यांचा विषय केवळ दिवाळीपुरता मर्यादित नाही. त्याचा आवाज करायला आपल्याला कोणतेही निमित्त पुरते. विराटच्या दहा हजार धावा झाल्या, निवडणुकीत विजय झाला, तो दणदणाटानेच साजरा केला जातो व रात्री बारा-एक-दोन असे कोणतेही बंधन आणि मर्यादा त्याला नसतात. ज्यांनी हे रोखायचे ते रोखू शकत नाहीत. जे रोखण्याचा प्रयत्न करतात त्यांना एकाकी पाडले जाते. एकाकीपणामुळे येणारे सगळे त्रास त्यांना भोगावे लागतात. न्यायालयाने गेल्या वेळच्या तुलनेत यंदा सौम्य भूमिका घेतली आहे. सरसकट बंदीऐवजी काही बंधने घातली आहेत. त्यामुळे सण साजरा करणाऱ्यांनीही स्वसंयम बाळगला पाहिजे. ध्वनी आणि वातावरणाचे प्रदूषण हे कायमस्वरूपी नुकसान करणारे आहे. प्रदूषण कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला इजा करत असते. अशा स्थितीत आपण स्वत:ला बदलायलाच हवे. न्यायालयाने आदेश कशाला द्यायला हवा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)