पेव्हर ब्लॉक्‍स : निधीची नासधूस व पर्यावरण ऱ्हास

      चर्चा

   नित्तेन गोखले

सामान्यतः ब्लॉक्‍सचा वापर करून बनविलेले पदपथ पाच वर्षे टिकते; परंतु चुकीच्या पद्धतीने बसवल्यामुळे तो एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ब्लॉक जागेवर टिकत नाहीत. दुर्दैवाने, सध्या बहुतांश शहरांमध्ये अनेक ठिकाणी उखडलेल्या पेव्हर ब्लॉक्‍सचे चित्र दिसते. न्यायालयात याप्रकरणी अनेक याचिका प्रलंबित आहेत…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यातील कोणत्याही पदपथावर केवळ दहा मिनिटे चालल्यावर आपल्यास दिसून येईल की, पदपथाचा पृष्ठभाग तुटलेल्या, ढिल्या किंवा वर आलेल्या पेव्हर ब्लॉक्‍स्मुळे असमान झाला आहे. याचा पादचाऱ्यांना चालतांना त्रास होतो. पदपथ आणि सायकल ट्रॅक व्यतिरिक्‍त शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर देखील रस्त्याच्या मधोमध तुटलेले पेव्हर ब्लॉक दिसून येतात.
महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व महापालिकांच्या पथ विभागाचे अधिकारी सध्या डांबर, सिमेंट कॉंक्रीट तसेच पेव्हर ब्लॉकचा वापर करायचे आदेश देतात.

पथ विभागातील अभियंता ब्लॉकच्या वापराचे समर्थन करतात, कारण रस्त्याच्या काही भागांच्या खालून पाणी व गॅसच्या लाईन जातात. यांच्यात काही काम निघाल्यास डांबरी किंवा सिमेंटचे भाग खोदण्यापेक्षा पेव्हर ब्लॉक पटकन काढून काम करता येते. रस्त्यात मोठे खड्डे झाल्यावर देखील ते पटकन बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर केला जातो. तथापि, ढिल्या किंवा वर आलेल्या ब्लॉक्‍समुळे रस्ता दुचाकी चालवणाऱ्यांसाठी धोकादायक ठरतो.

पायवाट असो किंवा मुख्य रस्ता, पेव्हर ब्लॉक बसवणे हे कौशल्याचे काम आहे. ब्लॉक्‍सच्या खाली, रेतीचा थर, सिमेंट कॉंक्रीट थर, मिक्‍स मकदम थर आणि मातीचा थर योग्य रित्या रचावा लागतो. या कामासाठी अनुभवी कामगारांची गरज पडते. बसवताना कामात चूक झाली, तर काही दिवसात एखादा ब्लॉक निखळतो व हळूहळू सर्वच पेव्हर ब्लॉक निसटतात.
मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या स्थायी तांत्रिक सल्लागार समितीने 2009 साली बृहन्मुंबई महानगर पालिकेला मुख्य रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक्‍सचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ब्लॉकच्या वापराबाबत एका याचिकेवर सुनावणी करताना, उच्च न्यायालयाने पेव्हर ब्लॉक्‍सच्या होत असलेल्या वापराबाबत नाराजी व्यक्‍त केली.

 पर्यावरणावर होणार परिणाम

पुणे शहराच्या अनेक गल्ली-बोळात देखील सिमेंट व पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनवण्यात आले आहेत. रस्त्यांच्या कोपऱ्यातील जागासुद्धा पेव्हर ब्लॉक्‍सने बुजवण्यात आल्या आहेत. बागेत, तसेच इतर खुल्या जागेत याचा वापर केला जातो. याचे पर्यावरणावर अनेक परिणाम होत आहेत. कॉंक्रिटच्या वापरामुळे पाऊस पडल्यानंतर पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याचबरोबर, पाणी न मिळाल्यामुळे शहरात गल्ली-बोळात तसेच मोठ्या रस्त्यावर हजारो झाडे मरत आहेत नाहीतर मग नुसती कॉंक्रीट मध्ये अडकून आहेत.

एप्रिल 2013 मध्ये, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने (एनजीटी) स्पष्ट निर्देश दिला की कोणत्याही झाडाच्या खोडापासून एक मीटर त्रिज्यामध्ये कॉंक्रिटचा वापर करून कसलेही काम करू नये. अर्बन ग्रीनिंग गाईडलाईन्स 2014 मध्ये देखील हे नमूद केले आहे. परंतु, या नियमांचे उल्लंघन जवळजवळ भारतातील प्रत्येक शहरात केले जाताना दिसते. भूजल सर्वेक्षण व विकास संस्थेने (जीएसडीए) दोन वर्षांपूर्वी पुण्यातील घटत्या भूजल पातळीबाबत चिंता व्यक्‍त केली होती. सिमेंटचे रस्ते व पेव्हर ब्लॉकच्या अतिवापरामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरणे भयंकर कमी झाले आहे असे मत त्यानी अहवालात मांडले होते.

सिमेंट आणि रेती व्यतिरिक्‍त, बांधकाम वस्तूंच्या कचऱ्यापासून किंवा टाकावू सिमेंट कॉंक्रीटचे पुनर्विनीकरण करून देखील ब्लॉक्‍स बनवले जातात. कमी प्रमाणात कॉंक्रिट असलेल्या ब्लॉक्‍सचा वापर काही महानगरपालिका करत आहेत. पण याने देखील फारसा फरक पडेल की नाही हा मुद्दा कदाचित चाचण्या केल्यावरच स्पष्ट होईल. याबाबत वेगवेगळ्या शहरातील महानगरपालिकांसाठी सल्लागार समित्यांनी तयार केलेले अहवाल कदाचित कोणीही न वाचल्यामुळे धूळखात पडले आहेत.

नगर विकास खाते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. या खात्यातील बाबू लोकांनी पेव्हर ब्लॉक्‍समुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास लवकरात लवकर करायला हवा. महत्त्वाची बाब म्हणजे, अनेक राजकारणी सध्या पेव्हर ब्लॉक्‍स बनवण्याच्या व्यवसायात आहेत. कदाचित यामुळेच राजकारणी मंडळी या विषयावर फारसे बोलण्यास उत्सुक नसतात.

एक सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी या मुद्द्यावर आपले मत मांडले. ते म्हणाले की, युटीलिटी सर्व्हिसच्या नावावर पेव्हर ब्लॉकचा जोरदार वापर सुरू आहे, सगळ्याच शहरात. खरे तर शासनाने यावर बंदी आणायला हवी. नक्कीच पेव्हर ब्लॉकचा उपयोग टाळायला हवा. ज्या रस्त्यांवर फक्‍त रिक्षा व मोटारसायकलची वाहतूक होते तिथे ठीक आहे, पण मेनरोडच्या बाजूला नको. कारण दहा टनच्या वरच्या गाड्यांनी पेव्हर ब्लॉक विस्कळीत होतात. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास हे ब्लॉक अडचणीचे ठरतात. ब्लॉक्‍समधील फटीत पाणी साचून राहते, त्यामुळे, सर्वांत चांगला उपाय म्हणजे सरळ कॉंक्रीट रस्त्याच्या बाजूला डांबरीकरण करणे ठरेल. पेव्हर ब्लॉक्‍स सर्वांना आवडतात कारण दर पाच वर्षांनी नवीन नगरसेवकाला पुन्हा रस्त्याची व फूटपाथची फाईल काढायची असते, असे इरफान शेख म्हणाले. एकूण काय, या सर्वात दुर्लक्षित पण महत्त्वाच्या विषयाकडे विद्यमान सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)