पेरले तसेच उगवतेय (अग्रलेख)

तुमच्या चार पिढ्यांचा अगोदर हिशेब द्या, मग मी माझ्या चार वर्षांच्या कामाचा हिशेब देतो, हे टाळ्या वसूल करणारे वाक्‍य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्तीसगड येथील सभेत पुन्हा फेकले. टाळ्या वसूल केल्या. मात्र या टाळ्यांत जोर किती होता, चार वर्षांपूर्वी आपण जेव्हा हे बोलत होतो, तेवढा नक्कीच नाही, याची स्वत: मोदी यांनाही जाणीव असणार. तेच भाजपचे आगामी लोकसभा निवडणुकीतील प्रारब्ध आहे. एका वाक्‍यावर वा एका थीमवर तुम्ही काही काळ काही लोकांना भुरळ घालू शकता. सदासर्वकाळ सगळ्यांनाच भूलवू शकत नाही. याची भाजपला खरेतर एव्हाना जाणीव झाली असावी असे वाटत होते. मात्र ती तशी झालेली दिसत नसून, त्यामुळेच लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीतील पक्षासमोरचे आव्हान किती खडतर आहे, याची झलक दिसू लागली आहे.

पाच वर्षांपूर्वी मोदी यांच्या कुंडलीतील ग्रह प्रबळ होते. यश आणि संधी त्यांच्याच वाटेकडे डोळे लावून बसले होते. देशातील बहुतेक राज्यात अशी स्थिती होती. कोणत्याही राजकीय नेत्याच्या राजकीय जिवनातील हा परमोच्च क्षण असतो. उदंड लोकप्रियता सगळ्यांच्याच वाट्याला येत नाही. अनेक दशके खस्ता खाल्ल्यानंतर उतारवयात काहीतरी गवसते. मात्र मोदींचा पाच वर्षांपूर्वीचा तो काळ असा होता की, त्यांची सिंहासनावर बसण्याची औपचारिकताच फक्‍त बाकी होती. त्या निवडणुकीला व त्यातील भारतीय जनता पार्टीला नंतर मोदी लाटेचेच नाव दिले. यश मोठे असले की सावध व्हायचे असते ते याच वेळी. कारण सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यावर तेथे टिकून राहणे अवघड असते. तेथे धोका असतो तो फक्‍त घसरणीचा. ती घसरण थांबवणे अवघड असते. याचे विस्मरण झाले की स्थिती बिकट होते.

भाजपच्या नेतृत्वाला व लहान सहान नेत्यांनाही याचे भान राहिलेले नाही व त्यामुळेच सर्वोच्च नेत्यापासून गल्लीतील पुढाऱ्यापर्यंत सगळ्यांकडूनच अजूनही तीच आणि तीच आतषबाजी सुरू आहे. ज्यात आता कोणाला फारसे स्वारस्य राहीलेले नाही. लोकप्रियतेचा आलेख घसरू लागला आहे. अच्छे दिनच्या त्या काळात पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या साधन शुचितेचे कायम स्मरण ठेवत त्यानुसारच मार्गक्रमण करायला हवे होते. मात्र ते सोडत त्यांनी स्वत:ला निवडणूक जिंकणाऱ्या यंत्रात परावर्तीत केले आणि त्यासाठी विधीनिषेध शून्य तडजोडी केल्या.

“आयाराम गयाराम’चा व्यापार घाऊक प्रमाणात सुरू केला व त्यावेळी पावन करून वाल्मीकी करण्यासाठी ज्यांना ज्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला त्यांनी त्यांनी आता क्रमाक्रमाने आपली नखे बाहेर काढायला सुरूवात केली आहे. राजस्थानात ऐन मतदानाच्या तोंडावर एका खासदाराने व आमदाराने पक्षाला रामराम केला. मध्य प्रदेशातही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पक्षादेश झुगारून रिंगणात राहिलेल्या 80 पेक्षा जास्त जणांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागला आहे. महाराष्ट्रात अगोदरच एका खासदाराने पंतप्रधानांवरच नेम धरत दुगाण्या झाडायला सुरुवात केली होती. पक्षाशी पटले नाही म्हणून नाना पटोले नावाच्या या महाशयांनी कॉंग्रेसचा झेंडा पुन्हा खांद्यावर घेतला. मात्र तसे करण्यापूर्वी त्यांनी पक्षाची विदर्भात पुरती नाचक्‍की केली. त्यांच्याच भागातले आणखी एक आमदार आशिष देशमुख यांनीही त्यांचाच कित्ता गिरवला व भाजपशी काडीमोड घेतला. आता धुळ्याचे आमदार अनिल गोटेही त्याच मार्गावर आहे.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याच उपस्थितीत त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर दोन दिवसांपूर्वी जो धिंगाणा घातला त्यामुळे पक्षाला तोंड लपवण्यासही जागा राहिलेली नाही. याशिवाय प्रत्येक राज्यातील, प्रत्येक शहरातील असे डझनावारी वाल्मीकी सध्या कुंपणावर बसले आहेत. कारण या मंडळींना कोणत्याही विचारधारेचे वावडे नसते. त्यांना फक्‍त सत्तेशी जवळीक, तिचे संरक्षण व तिची झूल पांघरून मिरवायचे असते. भाजप असो वा अन्य कोणी याचे त्यांना सोयरसुतक नसते. अर्धे शतक विरोधी पक्षात काढणाऱ्या भाजपला याचे भान असायला हवे होते. मात्र जिंकणे आणि कोणाला तरी राजकीय पटावरून नाहीसे करणे याच इर्षेने लढायला सुरुवात केल्यानंतर व्हायचा तो बाजार झाला आहे. याची सुरुवात गुजरातमधील राज्यसभेच्या जागेपासून झाली. तोपर्यंत मोदींच्या विरोधात ब्र काढण्याची हिंमत गमावून बसलेले विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या अहमद पटेलांच्या धक्‍कादायक विजयानंतर दहशतीतून सावरले.

गोव्यात आणि कर्नाटकात जनादेश नसतानाही सत्तेसाठी दाखवलेला हावरटपणाही भाजपला जाचदायक ठरला व आता बदलत्या हवेचा अंदाज घेत दावणीला दाखल झालेल्यांनीही फुत्कार सोडायला सुरुवात केली आहे. भारतीय मतदारांचाही एक इतिहास आहे. त्यांनी कोणालाही कायम डोक्‍यावर बसवून ठेवलेले नाही. पंडित नेहरूंचा कालखंड संपल्यानंतर कोणत्याही पंतप्रधानांना सातत्य राखता आलेले नाही. 1971 नंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारचे पाय कंप पावायला तीनच वर्षात सुरुवात झाली होती.

लोकसभेत ऐतिहासिक आकडा प्राप्त करणारे राजीव गांधीही 1987 पासून बोफोर्सच्या माऱ्यापुढे टिकाव धरू शकले नाहीत. आता मोदींचा त्याच दिशेने प्रवास सुरू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. विरोधक, बाहेरून आलेले आणि आत असलेले असंतुष्ट असे तिहेरी आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. पण तत्वांना देऊन केलेली पेरणी व त्यातून आलेले पीक हेच आता सगळ्यांत मोठा अडसर ठरताना दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)