पुणे – पेठांमधील पुणेकरांचा रविवार “पाण्यात’

व्हॉल्व्ह नादुरुस्तीमुळे पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत


सायंकाळी उशिरापर्यंतही अनेक भागात निर्जळी

पुणे – शहरातील सर्व मध्यवर्ती पेठांचा पाणीपुरवठा रविवारी पुन्हा एकदा विस्कळीत झाला. पर्वती जलकेंद्रातून या सर्व पेठांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्वचा गियर बॉक्‍समध्ये बिघाड झाल्याने पहाटे चार वाजेपासून पाण्याचे वेळापत्रक कोलमडले. त्यानंतर सकाळी 6 वाजता महापालिकेच्या पाणीपुरवठाने व्हॉल्व दुरुस्ती हाती घेतली. तब्बल चार तासांनंतर हा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत पेठांमधील अनेक भागांमध्ये पाणी आले नाही, अशा तक्रारी करण्यात येत होत्या.

मध्यवर्ती पेठांना पाणीपुरवठा करणारी 1,200 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी पर्वती जलकेंद्रातून नीलायम चित्रपटगृहाच्या मागील बाजूने शहरात जाते. ही मुख्य जलवाहीनी असून यावर सुमारे 42 इंचीचा व्हॉल्व सुमारे 25 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेला आहे. पहाटे 4 च्या सुमारास मुख्य टाकीतून पाणी सोडण्यात आल्यानंतर या व्हॉल्ववर लोड आल्याने त्याचा गियर बॉक्‍समध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे पाणी पुढे जाऊ शकत नव्हते. परिणामी, या वेळी व्हॉल्वमधून पाण्याची गळतीही मोठ्या प्रमाणात सुरू झाली. असे असतानाच, सकाळच्या नियोजित वेळेत पाणी न आल्याने अनेक नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यावेळी सकाळी 6च्या सुमारास या ठिकाणच्या व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. मग पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच वाहिनीत संपूर्ण पाणी असल्याने हे काम करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना तब्बल चार ते साडेचार तासांचा कालवाधी लागला. त्यानंतर सर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात अनेक भागात कमी दाबाने पाणी
पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत सुमारे 6 तासांचे पाण्याचे वेळापत्रक कोलमडल्याने पेठांमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. सध्या शहरात एक वेळच पाणी देण्यात येत असून प्रत्येक भागात सरासरी अडीच ते तीन तासच पाणी जात आहे. त्यातही अचानक झालेल्या बिघाडाने पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने काही भागात अतिशय कमी दाबाने पाणी आले. तर काही भागात सायंकाळी उशिरापर्यंत पाणीच आले नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या.

पाण्यासाठी वणवण
प्रजासत्ताक दिनालाच जोडून रविवारची सुट्टी असल्याने अनेक पुणेकर शनिवारी शहराबाहेर होते. त्यातील बहुतांश पुणेकर रात्री उशिरा घरी परतले असले, तरी सकाळी अचानक पाणीच गायब झाल्याने त्यांची वणवण झाली. त्यातच; पाणी बंद असल्याची कोणतीही घोषणा नसल्याने अनेकांनी थेट लोकप्रतिनिधींनाच फैलावर घेतले. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी मेसेज करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच दुपारी 12 नंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची कल्पना देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)