पेट्रोल दरवाढी विरोधात कॉंग्रेस राज्यभर आंदोलन छेडणार

  •  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई – देशभर पेट्रोलचे दर कमी झाले असताना राज्यात मात्र ते वाढले आहेत. या पेट्रोल दरवावाढीविरोधात आम्ही आठवडाभरात महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याची घोषणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
राज्य सरकारचा खर्च प्रचंड गतीने वाढत आहे. मात्र, आर्थिक नियोजन अजिबात नाही. त्यामुळे कर वाढवण्याचा सपाटा भाजप सरकारने लावला आहे. सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. सरकारने यापूर्वी सरकारने दुष्काळ जाहीर न करता पेट्रोलवर 6 रुपये अधिभार लावला आहे. देशात सगळ्यात महाग पेट्रोल आपल्या राज्यात आहे, अशी टीका त्यांनी केली.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत उड्डाणपुलासाठी पेट्रोलवर दोन रुपये अधिभार लावला. टोल वसुली संपली तरी हा अधिभार सुरू आहे. सरकार उधळपट्टी करते, शिवस्मारक जाहिरातीवर 18 कोटी खर्च केले. आमचा शिवस्मारकाला विरोध नाही, पण जाहिरातीवर एवढा खर्च का केला, असा सवाल त्यांनी केला.
आमच्या संघर्ष यात्रेनंतर आता सरकार संवाद यात्रा काढणार आहे. म्हणजे या सरकारचा संवाद शेतकऱ्यांबरोबर नव्हता आणि शेतकऱ्यांना साला म्हणणारे रावसाहेब दानवे संवाद साधणार ही हास्यास्पद गोष्ट आहे. आधीच बांधकाम क्षेत्र अडचणीत आहे, त्यात मुंद्रांक शुल्कात केलेली वाढ ही सामान्य माणसावर अन्याय करणारी आहे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)