पेट्रोल, डिझेल चोरणाऱ्या माफियांचे अड्डे

पुणे-महामार्गावर धंदा तेजीत; पेट्रोलियम कंपन्यांच्या टर्मिनल प्रशासनाला गुंगारा

राजेंद्र (बापू) काळभोर

लोणी काळभोर- येथील पेट्रोलियम कंपन्यांच्या टर्मिनल मधून बाहेर पडणाऱ्या टॅंकर मधून मास्टर की वापरून पेट्रोल, डिझेल चोरणारे माफिये शासकीय यंत्रणेला गुुंगारा देत पुन्हा सक्रिय झाले असून हा धंदा तेजीत चालला आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या दहा किलोमिटर व्यासाच्या अंतरात छोटे मोठे साधारण दहा तरी पेट्रोल माफियांचे अड्डे आहेत. या ठिकाणांची माहिती ठराविक टॅंकर चालकांना असते. टॅंकर भरला की, हे चालक पहिल्यांदा टॅंकर या माफियांच्या ठिकाणी जातात. तेथे देण्या-घेण्याचा व्यवहार पार पडतो. पाच ते दहा मिनिटात टॅंकर तेथून बाहेर पडतो. गेल्या काही वर्षांपासून टॅंकरला जीपीएस सिस्टीम बसविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व टॅंकर माफियांचे अड्डे महामार्गाच्या शेजारी आहेत. त्यामुळे पोलिसांना, पुरवठा विभागाला किंवा शासनाच्या कुठल्याही विभागाला अशा धंद्याबाबत शंका येत नसावी परंतु, यातही काळेबेरे असण्याची शक्‍यता खुद्द सरकारी यंत्रणेतूनच व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल, डिझेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यंतरी असेच पेट्रोल चोर पकडले होते. पेट्रोल, डिझेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना लोणी काळभोर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड टर्मिनल मधून बाहेर पडणाऱ्या टॅंकरमधून काही माफिये पेट्रोलजन्य मालाची चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. याची शहानिशा करण्यासाठी असोसिएशनचे पदाधिकारी लोणी काळभोर येथे आले होते. पाहणी करण्यासाठी ते टर्मिनल गेट समोर असलेल्या पार्किंग मधून फिरत असताना तेथे एक टॅंकर टर्मिनल मधून पेट्रोलजन्य पदार्थ भरून आला व तो पार्किंग मध्ये लावून चालक हा चलन आणण्यासाठी ऑफिसमध्ये गेला. हा मोका साधून तेथे दोन अनोळखी इसम आले, त्यांनी त्यांच्या जवळील चावीने टॅंकरच्या वरच्या झाकणाचे कुलूप उघडले. त्यांत पाईप टाकून एका प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये डिझेल काढू लागले. असोसिएशनचे पदाधिकारी यांनी त्यांना जागीच पकडले. त्यांच्याकडून उघडलेले कुलूप व तीन चाव्या तसेच कॅनमध्ये असलेले 20 लिटर डिझेल ताब्यात घेतल व त्या दोघांचा फोटो काढला.

यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस पथक जागेवर पोहोचले. तत्पूर्वी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी तेथे पांढऱ्या रंगांची एक कार तेथे उभी असलेली दिसली. त्यामध्येही पेट्रोल, डिझेलचा साठा होता. पदाधिकारी पाहणी करण्यात दंग आहेत, याचा मोका साधून ते दोघेही कार घेऊन फरार झाले. पोलीस पथक तेथे पोहोचले नंतर त्यांनी माल जप्त केला व पुरवठा विभागास कळवले. पुरवठा निरीक्षक तेथे पोहोचले व त्यांनी पंचनामा करून दोन अज्ञात इसमांविरोधांत फिर्याद दिली.

पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या अड्ड्यांवर पेट्रोलजन्य पदार्थ बनावट चाव्याचा वापर करून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात काढले जात असल्याची माहिती पुणे येथे मिळते. परंतु, येथून अवघ्या दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यास किंवा हिदूस्थान पेट्रोलियम टर्मिनल किंवा भारत पेट्रोलियम टर्मिनलच्या पदाधिकारी अथवा पोलीसांना कशी मिळत नाही. की ते या बाबीकडे मुद्दामच कानाडोळा करतात, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

  • टॅंकरच्या चाव्यांचा घोळ….
    लोणकाळभोर येथील टर्मिनल मधून पेट्रोल, डिझेल भरून कुलूप लावल्यानंतर बाहेर पडलेल्या टॅंकरच्या वरच्या झाकणाची एक चावी कंपणीकडे टर्मिनलमध्ये तर दुसरी पंपमालकाकडे असते मग चोरट्यांकडे तीन चाव्या कोठून आल्या? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे याप्रकरणात टर्मिनल मधील एखादा अधिकारी यात सामील असल्याची शक्‍यता पोलीस खात्याकडूनही वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)