पेट्रोल, डिझेलची दरवाढ कायम ; गॅसही महागला 

file pic
अनुदानित सिलिंडरने ओलांडली 500 रूपयांची पातळी 
नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेल दरवाढीचे सत्र सोमवारी कायम राहिले. एवढेच नव्हे तर, अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करून सार्वजनिक इंधन कंपन्यांनी दरांच्या भडक्‍यामुळे होरपळलेल्या सामान्य जनतेला आणखी एक चटका दिला. दरवाढीमुळे सिलिंडरने प्रथमच 500 रूपयांची पातळी ओलांडली आहे.
सोमवारी लिटरमागे पेट्रोल 24 तर डिझेल 30 पैशांनी महागले. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत त्या इंधनांची किंमत अनुक्रमे 83.73 रूपये आणि 75.09 रूपये इतकी झाली. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलने 91 रूपयांचा टप्पा पार केला. त्या महानगरीत डिझेलचा दर आता 80 रूपयांजवळ जाऊन ठेपला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांच्या किमतीत वाढ झाली आहे. याशिवाय, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाचे अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे कच्च्या इंधनांच्या आयातीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. त्यातून इंधन दरवाढीचे सत्र चालू आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून आतापर्यंत लिटरमागे पेट्रोल 6.59 रूपयांनी तर डिझेल 6.37 रूपयांनी महागले आहे.
एकीकडे पेट्रोल, डिझेलचे दर नवनवा उच्चांक करत असताना दुसरीकडे स्वयंपाकासाठी घरगुती वापर होणाऱ्या अनुदानित गॅस (एलपीजी) सिलिंडरच्या (14.2 किलो वजनी) दरात 2 रूपये 89 पैशांची वाढ झाली. त्यामुळे सिलिंडरचा दर 502.40 रूपये इतका झाला. अनुदानित सिलिंडर सलग पाचव्या महिन्यात महागला आहे. मेमध्ये त्याचा दर 491.21 रूपये इतका होता. प्रत्येक कुटूंबाला दरवर्षी 12 अनुदानित सिलिंडर दिले जातात. ते सिलिंडर बाजारभावानुसारच खरेदी करावे लागतात. मात्र, अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा केली जाते. सप्टेंबरमध्ये 320.49 रूपये अनुदान सिलिंडरवर दिले जात होते. ऑक्‍टोबरमध्ये ते 376.49 रूपये करण्यात आले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)