नवी दिल्ली – गगनाला भिडलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरून कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पेट्रोलचा दर शंभरी गाठणार का आणि इंधन दरवाढीबाबत मोदी गप्प का, असे सवाल कॉंग्रेसने केले.

इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. तो पक्षाचा बंद नसून सामान्य जनतेचा आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील करांपोटी मोदी सरकारने 11 लाख कोटी रूपये कमावले. सामान्य माणसाने तो कर दिला. त्यामुळे जनतेने रस्त्यांवर उतरून निदर्शनांत सहभागी व्हावे, असे आवाहन करत कॉंग्रेसचे प्रवक्ते आर.पी.एन.सिंह यांनी मोदींना लक्ष्य केले. इंधन दरवाढीविरोधात सर्वच विरोधी पक्ष रस्त्यांवर उतरतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

दरम्यान, केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना मोदींनी रूपया रूग्णालयात असल्याचे म्हटले होते. आता रूपयाच्या मूल्याने नीचांकी पातळी गाठली असताना मोदी कुठे आहेत? ते भाषणही देत नाहीत आणि ट्‌विटही करत नाहीत. रूपया आज रूग्णालयात आहे का? मोदींनी मौन का बाळगले आहे हा प्रश्‍न देश त्यांना विचारू इच्छितो, असे सिंह यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)