पेटत्या आडामुळे माण तहसील कार्यालय धुरात

निरुपयोगी कागदपत्रांचे गठ्ठे जाळण्यासाठी चक्क आडाचा वापर ः नागरिकांत नाराजी

गोंदवले, दि. 16 (वार्ताहर) – माण तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले खरे, परंतु, या इमारतीखालील निकामी व धोकादायक आड मात्र अजूनही न बुजवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा आड धोकादायक बनू शकत असल्याने याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे.
ब्रिटिश काळात तहसील कार्यालयाच्या आवारात कामानिमित्त येणार्‍या लोकांची पाणी पिण्याची व्यवस्था असावी म्हणून तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस बांधीव दगडी आड अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. कालांतराने पाण्यासाठी नवनवीन स्रोत निर्माण झाल्याने या आडाचा पाण्याचा स्रोत बंद झाला व आडाचा वापरही बंद झाला. सध्या याठिकाणी मुख्य तहसील, पोलीस ठाणे, निवडणूक शाखा, दुय्यम निबंधक, संजय गांधी योजना, सेतू अशी इतर उपकार्यालये आहेत. त्यामुळे लोकांची मोठी वर्दळ असते. गेल्या काही वर्षांपासून या आडाचा उपयोग चक्क कचराकुंडी म्हणून केला जात आहे. आडाला एका बाजूने कसलेही संरक्षक कठडे नसल्याने तीन फुटांचा भाग मोकळा आहे.

यात तहसीलदार कार्यालयातील निरुपयोगी केलेले कागदपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे त्यात टाकलेले असून अनेक प्रकारचे निर्माल्यही टाकल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सर्व कार्यालयात काम करणार्‍या अधिकारी कर्मचारी आणि येणार्‍या लोकांना याचा त्रास होऊ लागला यामुळे आरोग्यही धोक्यात आले आहे.
सध्या हा आड तसाच ठेवून वरच्या भागात नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. आडातील टाकाऊ कागदपत्रे नष्ट करण्यासाठी आग लावल्याने येथे येणार्‍या लोकांसह अधिकारी व कर्मचार्‍यांना धुराचा त्रास सोसत दिवसभर थांबावे लागत आहे. तसेच नवीन इमारतीच्या पाईपफिटींगला धोका निर्माण होऊ शकतो. नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण होऊनही हा आड मात्र, तसाच ठेवला असल्याने या पेटत्या आडात नेमकं काय शिजत आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)