पॅरा-बॅडमिंटन विश्‍वक्रमवारीत सुकांत कदम दुसऱ्या क्रमांकावर

 

पुणे – पुण्यातील निखिल कानेटकर बॅडमिंटन ऍकॅडमीच्या (एनकेबीए) सुकांत कदम याने बीडब्ल्यूएफ पॅरा-बॅडमिंटन जागतिक मानांकन विश्‍वक्रमवारीत झेप घेत दुसऱ्या क्रमांक पटकावताना आपल्या कारकिर्दीत महत्वाचा टप्पा गाठला.

मूळच्या सांगलीच्या असणाऱ्या सुकांतने या मानांकनासह टोकीयो 2020 पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवेशाकडे वाटचाल केली आहे. जागतिक मानांकनामध्ये याआधी सुकांतचा तिसरा क्रमांक होता. सर्वोत्तम कामगिरी आणि सातत्यपणा यामुळे सुकांतने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. थायलंड आणि आयर्लंड येथे झालेल्या स्पर्धेत सुकांतने सलग कांस्यपदक मिळवले होते. यासाठी त्याला 30 आणि 75 गुण मिळाले होते. सुकांत हा एसएल 4 हा गटामध्ये खेळतो.

सुकांतने आत्तापर्यंत स्पेन, युगांडा, तुर्की, थायलंड आणि आयर्लंड येथील स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. पॅरा बॅडमिंटन विश्‍वक्रमवारीत द्वितीय मानांकन गाठणारा सुकांत हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी पारूल दलसुखाभाई परमार हिने जागतिक क्र. 1 (महिला एसएल3 गट) व मनोज सरकार यांनी जागतिक क्र. 2 (एसएल3 पुरुष गट) यांनी अव्वल मानांकन गाठले होते.

या कामगिरीबद्दल सुकांत याने सांगितले की, 2020 टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे. मला अजून खूप पल्ला गाठायचा असून त्यासाठी कठोर परिश्रमांची गरज आहे. निखिल सरांचे मार्गदर्शन त्यासाठी महत्वाचे ठरत असून पुढील कामगिरीमध्ये यशाचा आलेख चढता ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे.
एनकेबीएचे संचालक आणि मुख्य प्रशिक्षक निखिल कानेटकर म्हणाले की, दुसरा क्रमाकांचे मानांकन मिळवणे, हे खूप मोठे यश आहे. सुकांतसारखे खेळाडू आमच्या ऍकॅडमीची शान आहेत. सुकांत हा मेहनती खेळाडू असून लवकरच आपले लक्ष्य संपादन करेल असा मला विश्‍वास वाटतो.

जागतिक मानांकन यादीतील सर्वोत्तम 5 खेळाडूः 1) लुकास माझूर (फ्रान्स-362.5 गुण); 2) सुकांत कदम (भारत-165 गुण); 3) सुहास लालिनखरे (भारत-162.5 गुण); 4) ओमर बाकरी (मलेशिया- 160 गुण); 5) तरुण ढिल्लॉं (भारत- 150 गुण).

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)