पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा: भालाफेकपटू संदीप चौधरी आणि सुयश जाधवची सुवर्णकमाई 

जकार्ता: भारताचा दिव्यांग भालाफेकपटू संदीप चौधरीने जकार्तात सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. संदीपने अंतिम फेरीमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 60.01 मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. तर, भारताच्या सुयश जाधवने आपली वैयक्तिक कामगिरी उंचावताना आशियाई पॅरा स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले.
जलतरणपटू सुयशने पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात 32.71 सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्ण कामगिरी केली. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे पदक आहे. यापूर्वी त्याने 200 मीटर वैयक्तिक मीडले आणि 50 मीटर फ्रिस्टाईल गटात कांस्यपदकांची कमाई केली आहे. 
आज झालेल्या 50 मीटर बटरफ्लाय एस 7 (6-7) गटात सुयशने चीन व थायलंडच्या जलतरणपटूंना पिछाडीवर टाकले. चीनच्या यांग होंगला ( 33.54 से.) आणि थायलंडच्या पयुंगसकुल बूनयारित ( 38.09 से.) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकता आले. भारताचे हे स्पर्धेतील आत्तापर्यंतचे 14 वे पदक ठरले. भारताने स्पर्धेत आता पर्यंत 2 सुवर्ण, 5 रौप्य व 7 कांस्यपदक जिंकले आहेत. 
तत्पूर्वी, रविवारी भारतीय संघाने पॅरा आशियाई स्पर्धेची दमदार सुरूवात करताना पहिल्याच दिवशी दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदकांची कमाई केली. या मध्ये भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 49 किलो वजनी गटात फर्मान बाशा आणि परमजीत कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. 
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला उपांत्य फेरीत मलेशियाकडून 1-2 असा निसटता पराभव पत्करावा लागला. सुहास यथीराजने एकेरीच्या पहिल्या लढतीत मलेशियाच्या बाक्री ओमारचा 21-8, 21-7 असा पराभव केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात सुहासने आक्रमक खेळ करताना सहज बाजी मारली. मात्र, दुहेरीत कुमार राज व तरुण या जोडीला आणि परतीच्या एकेरीत चिराग बरेथा यांना पराभव पत्करावा लागल्याने भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पॉवरलिफ्टिंग प्रकारात पुरुषांच्या 49 किलो गटात लाओ प्रजासत्ताकच्या लाओपाकडी पीयाने 133 किलो वजन उचलून सुवर्ण नावावर केले. भारताच्या फर्मानने 128 किलोसह रौप्य व परमजीतने 127 किलोसह कांस्यपदक जिंकले. 
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)