पॅरा आशियाई क्रीडास्पर्धा: हरविंदर सिंगमुळे भारताला तिरंदाजीत पहिले सुवर्ण

सातव्या सुवर्णासह भारताची सर्वोत्तम कामगिरी 

जकार्ता: भारताचा युवा तिरंदाज हरविंदर सिंगने पुरुषांच्या वैयक्‍तिक रीकर्व्ह प्रकारात सोनेरी यशाला गवसणी घालताना येथे सुरू असलेल्या पॅरा-आशियाई क्रीडास्पर्धेतील भारताची आगेकूच कायम राखली. या स्पर्धेतील भारताचे हे सातवे सुवर्णपदक ठरले. तसेच पॅरा-आशियाई क्रीडास्पर्धेच्या इतिहासातील भारतीय खेळाडूंची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

-Ads-

 

हरविंदर सिंगने पुरुषांच्या डब्लू2-एसटी या गटातील वैयक्‍तिक रीकर्व्ह प्रकाराच्या अंतिम लढतीत चीनच्या झाओ लिक्‍युए याचा 6-0 असा एकतर्फी पराभव करताना सर्वोच्च यशाची नोंद केली. पॅरा-आशियाई क्रीडास्पर्धेतील तिरंदाजीत भारताला मिळालेले हे पहिलेवहिले सुवर्णपदकही ठरले. डब्लू2 गटांत पॅराप्लेजिया, डिस्प्लेजिया किंवा दोन्ही पाय नसलेल्या आणि ज्यांना व्हीलचेअरची गरज आहे, अशा ऍथलीट्‌सचा समावेश होतो. तसेच एसटी गटांत मर्यादित हालचाल करू शकणाऱ्या ऍथलीट्‌सचा समावेश असून त्यांना व्हीलचेअरच्या साहाय्याशिवायही स्पर्धेत सहभाग घेता येतो. दरम्यान ट्रॅक अँड फील्ड प्रकारांतही भारतीय ऍथलीट्‌सनी पदकांची कमाई केली.

 

पुरुषांच्या एफ-11 गटांतील थाळीफेकीत भारताच्या मोनू घांगसने रौप्यपदकाची कमाई केली. घांगसने तिसऱ्या प्रयत्नांत 35.89 मीटर थाळीफेक करीत दुसरा क्रमांक पटकावला. इराणच्या ओलाद मेहदीने 42.37 मीटर फेक करताना नव्या आशियाई विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. एफः11 गटांत प्रामुख्याने दृष्टिहीनांचा समावेश होतो. तसेच पुरुषांच्या एफ-46 गटातील गोळाफेकीत भारताच्या मोहम्मद यासरने कांस्यपदक पटकावीत आपल्या देशाच्या पदकांमध्ये भर घातली. यासरने 14.22 मीटर गोळाफेक करीत तिसऱ्या क्रमांकाची निश्‍चिती केली. चीनच्या वेई एनलॉंगने 15.67 मीटर फेक करीत सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. तर कझाखस्तानच्या मानसुरबायेव्ह रॅव्हिलने 14.66 मीटर फेक करीत रौप्यपदक संपादन केले.

 

एफ-46 गटांत शरीराच्या कंबरेवरच्या भागातील अपंगत्व, स्नायूंना झालेली दुखापत किंवा हालचालींवर मर्यादा आणणाऱ्या दुखापतीचा समावेश आहे. भारताच्या आजच्या दिवसातील अन्य यशस्वी खेळाडूंमध्ये टेबल टेनिसपटू भावनाबेन पटेलचा समावेश आहे. भावनाने महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. तर सुधीरने पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंगमध्ये 80 किलो वजनगटांत कांस्यपदकाची कमाई केली. बुद्धिबळात कनिकाई इरुदयराजने स्टॅन्डर्ड पी-1 गटांत रौप्यपदकाची कमाई केली. या सर्वांच्या कामगिरीमुळे पॅरा-आशियाई क्रीडास्पर्धेतील भारताची पदकसंख्या 36वर पोहोचली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)