पृथ्वीवरील सर्वात अल्पजीवी सरडा

मदगास्कर हे आफ्रिकेच्या आग्नेयेला असलेले हिंदी महासागरातील एक बेट. निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे बेट आहे. अतिशय दुर्मिळ आणि हरतऱ्हेच्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजाती इथे आढळतात. वनस्पतीतज्ज्ञ, प्राणीतज्ज्ञ, पर्यावरणवादी या सगळ्यांच्या आकर्षणाचे, अभ्यासाचे मदगास्कर हे एक केंद्र आहे. याच बेटावर लाबोर्ड शॅमेलियन किंवा सरडाही आढळतो. जमिनीवरील सर्वांत कमी आयुष्य असलेला हा पृष्ठवंशीय जीव आहे. अवघ्या पाच महिन्यांचे या प्राण्याचे आयुष्य असते. आणि एवढ्या कमी वेळात तो जन्माला येण्यापासून प्रजोत्पादन करण्यासाठी अंडी घालून मरेपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास शास्त्रज्ञांना थक्क करणारा आहे.

जन्माला आल्यापासून हे प्राणी जीवनाचा आनंद घेत असतात. मिलनाच्या काळात आकर्षित करण्यासाठी ते वेगवेगळे आकर्षक रंग परिधान करतात. नैऋत्य मदगास्करमधील निसर्गाचा लहरीपणाही त्यांच्या जीवनक्रमात प्रतिबिंबित होतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. लाबोर्ड शॅमेलियन हे जमिनीवरील सर्वांत कमी आयुष्य असलेले पृष्ठवंशीय जीव आहेत आणि ते नैऋत्य मदगास्करमध्ये सापडतात. त्यांच्या जीवनमानावर तेथील हंगाम किंवा ऋतूमानाचा फार मोठा परिणाम दिसून येतो. कोरड्या हंगामात किंवा उन्हाळ्यात या सरड्याची केवळ अंडीच आपल्याला दिसून येतात. अंडी उबवण्याचा काळ साधारण आठ महिन्यांचा असतो.

-Ads-

पावसाळा सुरू होण्याच्या काळात हे प्राणी अंड्यातून बाहेर पडू लागतात. पावसाळ्यात कीटकांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली असते. त्याचा फायदा या सरड्यांना होतो आणि हे सरडे झपाट्याने वाढतात. तरूण होतात. एकदा त्यांचे मिलन झाले की माद्या अंडी घालतात आणि उन्हाळा येताच सर्व प्रौढ शॅमेलियन्स मरण पावतात.

या सरड्यांचा डॉ. क्रिस कार्स्टन यांनी अभ्यास केला आहे. पीएनएएस नावाच्या मासिकात त्यांनी केलेले संशोधन प्रकाशित झाले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सरड्यांच्या डझनभर जातींचे आयुष्यमान वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त असते. पण लाबोर्ड सरड्याचे जीवनमान अवघे चार ते पाच महिन्यांचे असते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवनचक्र हे दरवर्षीचे असते. डॉ. कार्स्टन यांचे म्हणणे आहे की जंगलात सरड्यांचा अभ्यास करणे खूप अवघड असते. एक तर भोवतालच्या वातावरणाशी मिसळून जाण्यासाठी त्यांच्यात रंग बदलण्याची क्षमता असते आणि त्यांचे वर्तनही खूप गुप्त स्वरूपाचे असते. मदगास्करच्या जंगलात आढळऱ्या या सरड्याचे संपूर्ण जीवन शास्त्रज्ञांना अभ्यासायचे होते. त्यांनी अतिशय काळजीपूर्वक या सरड्याचा अभ्यास केला.

अवघ्या बारा आठवड्यांचे आयुष्यमान असलेल्या सरड्यात बदलही अतिशय झपाट्याने होतात. त्यामुळे या सरड्यांना आळखणेही अवघड जाते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अंड्यातून बाहेर पडल्यावर काही वेळातच हे छोटे छोटे सरडे आजूबाजूच्या कीटकांवर तुटून पडतात. दिसायला इवलेसे असले तरी त्यांची भूक मोठी असते आणि दिसेल ते अन्न ते गट्टं करत असतात. त्यांच्या वाढीसाठी ते आवश्‍यकही असते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यात जणू वाढण्याची स्पर्धाच सुरू असते.

दर दिवशी अडीच मिमिने त्याचे आकारमान वाढत असते आणि लवकरच हे सरडे वयात येतात. माद्या नरांना आकर्षित करण्यासाठी अतिशय मोहक रंग परिधान करतात. तर नर माद्यांवर आपला हक्क बजावण्यासाठी परस्परांत लढत असतात. मिलनानंतर माद्या कोरडा हंगाम येण्याआधी म्हणजे उन्हाळा येण्याआधी अंडी घालतात. प्रौढ सरडे मरण पावतात आणि जीवनचक्र पुन्हा पहिल्यापासून सुरू होते.

नैऋत्य मदगास्करमधील हवामानात होणारे तीव्र बदल या सरड्यांच्या या विचित्र जीवनप्रवासाला कारणीभूत आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते. या सरड्यांच्या जीवनातील मोठा काळ हा अंड्यात जातो. यातून ज्यावेळी अन्नाची कमतरता असते त्यावेळीही त्यांच्यात जिवंत राहण्याची क्षमता यावी यासाठी असावे, असे शास्त्रज्ञांना वाटते. कारण अंड्यातून बाहेर आल्यानंतर हे प्राणी जेवढे जगतात, त्यापेक्षा जास्त काळ ते अंड्यात असतात. या छोट्याशा प्राण्याने शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले आहे. अशी विचित्र जीवनशैली आणि जीवनमान असलेल्या या सरड्यावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे. पण या सरड्याने जगायचे कसे याचा वस्तुपाठच सगळ्या जीवसृष्टीला दिला आहे.

कोणत्याही प्राण्याचे (अपवाद मानवाचा) जीवनकार्य निसर्गाने ठरवून दिले आहे. ते संपले की तो प्राणी मरणाची वाट पाहत राहतो. तसे या सरड्यांचे होत नाही. हे सरडे आपले जीवनकार्य संपले की एकत्रितपणे मरतात आणि त्यांचे जीवनचक्रही एकत्रितपणे सुरू होते. दरवर्षी नव्याने त्यांचे जीवनचक्र सुरू होते, हे आश्‍चर्यकारकच नाही तर तितकेच उत्कंठावर्धकही आहे. या सरड्यांमधील7 वयात येण्याची आणि नंतर वृद्धत्वाची प्रक्रिया कशी होते, याचा अभ्यास आता शास्त्रज्ञ करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)