पूल वाहून वर्ष झाले तरी प्रशासन सुस्त

औंध : आंबोळा येथील वाहून गेलेला पुल.

दिरंगाईमुळे होतोय ग्रामस्थांना त्रास : पुलाचे काम करण्याची मागणी

औंध, दि. 11 (वार्ताहर) – औंध गावातील आंबोळा ओढ्यातील पूल वाहून एक वर्ष होत आले तरी प्रशासन अजूनही सुस्त असून याचा त्रास शेतकरी आणि विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे.
औंध गावातील आंबोळा ओढ्यातील पूल मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने आंबोळा पाझर तलाव भिंत फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहात औंध खरशिंगे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आंबोळा वाड्यातील रस्ता व पूल वाहून गेला होता. याबाबत लेखी व तोंडी माहिती प्रशासनाला देऊनसुद्धा पुलाकडे कोणी लक्ष देत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून येत आहेत. आंबोळा ओढ्याच्या पुढील बाजूस असणाऱ्या सर्व शेतकरी वर्गाला त्याच्या शेतामध्ये कोणतीही शेती अवजार घेऊन जाता येत नाही. बियाणे व खते या परिसरातील शेतकऱ्यांना शेतात घेऊन जा जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. शेतातून निघालेले उत्पन्न आणण्यास कोणतेही वाहन तिथे पोचत नाही. तसेच शेतकरी वर्गातील असणारे पशुधन गुरे शेतात चरावयास घेऊन जाता येत नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात यातना सहन कराव्या लागत आहेत. तसेच त्यांचे मोठे नुकसान सध्या सुरू आहे. वस्तीवरून औंध येथील शाळेत येणाऱ्या मुला-मुलींची संख्या 30 ते 35 आहे व त्या मुलांना शाळेत सायकलवरून जाऊ शकत नसल्याने विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक वर्षासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून येत आहे. प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी या गोष्टीकडे त्वरित लक्ष द्यावे व पुलाचे व रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी विद्यार्थी व शेतकरी वर्गातून होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)