माळशिरस – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील टेकवडी येथे गुरुवारी (दि. 17
) रात्री वादळी वाऱ्यासह, गारांचा जोरदार पाऊस झाल्याने फळबागांसह, घरांवरील पत्र्याचे शेड, पोल्ट्री शेड, उसाचे फड, तसेच शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पत्र्याची शेड वाऱ्याने अंगावर पडून एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
उन्हाळ्यात पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या पुरंदर उपसा जल सिंचन योजनेचे पाणी प्रती दिन 5 हजार रुपये दराप्रमाणे 5 वेळा पाणी घेऊन आपल्या फळ बागा जगवून बागेला बहर आला असतानाच गुरुवारी (दि. 17) झालेल्या वादळी पावसाने सीताफळ बागांना लागलेली लहान लहान फळे आणि मोठ्या प्रमाणात फुले देखील गळून गेली, असे येथील शेतकरी हनुमंत कुंजीर यांनी सांगितले तर अनेक ठिकाणी फळ बागेतील पाने गळून पडली. याबरोबरच कारखान्याला देण्याजोगे झालेले उसाचे फड देखील भुईसपाट झाले. यामुळे उसाच्या उत्पनात देखील मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकासोबत शेतात साठवलेला कांदा देखील पावसामुळे भिजला असून, दोन महिन्यांपूर्वी डाळिंब बागेने धारण केलेले डाळिंबाचे फळ देखील या गारांच्या तडाख्यात सापडले. यामुळे शेतीमालाला हमीभाव नसल्याने फळबाग लागवडीकडे वळलेला शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.
या परिसरात वाऱ्याचा वेग इतका होता की परिसरातील अनेक झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. यामुळे काही अंशी वाहतूक बंद झाली होती. मात्र, ग्रामास्थांनी जेसीबीच्या साह्याने झाडे बाजूला केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला नाही.
वारा आणि पाऊस यांमुळे येथील खांडगे वस्ती परिसरात विजेचे खांब मोडून पडले, तर अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या. सुदैवाने विजेचा धक्का लागून कोणतीही जीवित हानी झाली नाही.
- गुरुवारी (दि. 17) सायंकाळी 8 च्या सुमारास अचानक पावासाचे वातावरण निर्माण झाले. सुसाट्याचा वारा सुटला आणि काही वेळांतच पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडासह जोरदार वारा आणि पाउस सुरु झाला. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. यामध्ये दत्तात्रय नामदेव जाधव यांच्या घरासमोरील पत्र्याचे शेड उचकटून घराच्या मागे असणाऱ्या बैलाच्या अंगावर पडून बैलाचा जागीच मृत्यू झाला. बैलाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना दत्तात्रय जाधव यांनाही दुखापात झाली आहे. मात्र बैलाचा जीव वाचविण्यात ते अपयशी ठरले, तर उडालेल्या पत्र्याच्या शेडचा आवाज आल्याने एक बैल खुंटी उपटून पळल्याने या अपघातातून बचावला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा