पूर्व “पीसीएमटी’ कर्मचाऱ्यांना न्याय कधी?

पिंपरी – पूर्व पीसीएमटी आणि पीएमटीचे विलीनीकरण होऊन पीएमपीएमएल प्रशासन अस्तित्वात आल्यानंतर पीसीएमटी कर्मचाऱ्यांच्या पूर्वी दिलेल्या सवलती, वेतनश्रेण्या रद्द करण्यात आल्या. पूर्व पीसीएमटीतील कर्मचाऱ्यांवर झालेला हा अन्याय दूर करावा आणि सेवानिवृत्त व सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांना काढून घेतलेली रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी याबाबत पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना पत्राद्वारे मागणी केली आहे. पुणे महानगर परिवहन (पीएमटी) आणि पिंपरी – चिंचवड महानगर परिवहन (पीसीएमटी) या दोन्ही सार्वजनिक वाहतूक संस्थांचे विलीनीकरण करून सन 2007 मध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ही नवीन सार्वजनिक वाहतूक संस्था अस्तित्वात आली. पूर्व पीसीएमटी असताना कामगारांना राज्य सरकार आणि महापालिकेचे सर्व नियम व अटी लागू होते. सरकारच्या निर्णयानुसार, पीसीएमटी कामगारांना वेतन, सेवा, सवलती, पदोन्नती देण्यात येत होत्या. हे सर्व नियम पीएमपीएमएल अस्तित्वात येईपर्यंत लागू होते. त्याचे लेखा परीक्षणही झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्व पीसीएमटीने विलीनीकरणापूर्वी कामगारांना दिलेल्या सेवा सवलती, वेतन या सुविधा पीएमपीएमएलने काढून घेतल्या आणि कामगारांच्या पगारातून रक्कम वसूल करण्यात आली. कित्येक कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीही थांबविल्या. एवढेच नाही तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या उपदान रकमेतूनही ही रक्कम वसूल करून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. पीएमपीएमएलच्या या बेकायदा निर्णयाविरोधात काही कारकुनांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयानेही कारकुनांच्या बाजूने निकाल दिला आहे. ही बाब लक्षात घेऊन पीएमपीएमएल प्रशासनाने पूर्व पीसीएमटीतील इतर कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळवून द्यावा, असे जाधव यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)