पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून युवकाचा खून

  • सहा जणांच्या टोळक्‍याचा हल्ला : अन्य एक मित्रही जखमी

तळेगाव-दाभाडे, (वार्ताहर) – व्यायाम करुन दुचाकीवरुन घरी जात असताना पूर्ववैमनस्यातून अनोळखी सहा जणांसह इतर आरोपींनी मोटारीने दुचाकीला धडक देऊन खाली पडून धारदार कोयत्याने डोक्‍यावर वार करून रोशन ज्ञानेश्‍वर हिंगे (वय 18, रा. इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे) याचा खून केला. ही घटना बुधवार दि. 28 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास तळेगाव दाभाडे-चाकण राज्यमार्गाजवळ ऐश्‍वर्या हॉटेलच्या बाजूला माळवाडी, ता. मावळ हद्दीत घडली.

सुनील कैलास कदम (वय 19, रा. इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे) असे जखमीचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुनील कदम याने फिर्याद दिली. रोशन हिंगे व त्याचा मित्र सुनील कदम हे दोघे त्यांच्या दुचाकीने (एमएच 12 डीपी 5714) तळेगाव दाभाडे स्टेशन येथील फिजिक्‍स जीममधून व्यायाम करुन घरी इंदोरीला निघाले होते. त्यांची दुचाकी माळवाडी हद्दीत ऐश्‍वर्या हॉटेलजवळ आली असता कारमधून आलेल्या सहा जणांसह अन्य आरोपींनी पूर्ववैमनस्यातून आधी त्यांच्या दुचाकीला मागून धडक देऊन खाली पडले.

आरोपींनी हिंगे याच्यावर धारदार कोयत्याने डोक्‍यात वार करुन गंभीर जखमी केले व त्याचा मित्र सुनील कदम याच्या हात व पायावर वार करून जखमी केले. हिंगे रक्ताच्या थारोळ्यात पडला, तर कदम याला क्षणभर काहीच समजले नाही. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. हिंगे याला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. जखमी कदम याच्यावर वैद्यकीय उपचार करून सोडून दिले.

शव विच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी केले. मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्याच्यावर इंदोरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रोशन हिंगेच्या मागे आई, वडील, दोन बहिणी आहे. रोशन हिंगे याचा मंगळवारी (दि. 27) रोजी त्या आरोपींसोबत वाद झाला होता, वेळीच पोलिसांत तक्रार केली असती तर अनर्थ टळला असता मुलाचा अचानक खून झाल्याने डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी देहुरोड उप विभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगुळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील, पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले, कर्मचारी अनिल भोसले, वाल्मिक अवघडे, नंदकुमार चव्हाण, सचिन काचोळे आदींनी भेट दिली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक, अपर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व देहुरोड उप विभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील तपास करीत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना केली असून त्वरितच अटक करण्यात येईल.

रोशन हिंगे याच्यावर तळेगाव, चाकणमध्ये गुन्हे
रोहित उर्फ बंटी शेवकर यांच्या खुनाच्या गुन्ह्यात व तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या गुन्ह्यात मयत रोशन हिंगे आहे. चाकण पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हाही दाखल आहे. हिंगे अल्पवयीन असल्याने गुन्ह्यातून सुटला होता.

तीन महिन्यांत पाच खून!
दि. 13 जानेवारी ते 28 मार्च 2018 पर्यंत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजू नामदेव केदारी (वय 47, रा. माळवाडी, ता. मावळ) याचा, दि. 13 जानेवारी रोजी पावसाचे पाणी भिंतीवर पडत असल्याने सख्ख्या भावाने व पुतण्याने खून केला. विनोद सुरेश गायकवाड (वय 28, रा. कामशेत ता. मावळ) याचा दि. 22 फेब्रुवारी रोजी पैशाच्या वादातून खून केला. शारदा अशोक चौरे (वय 37, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) हिचा दि. 24 फेब्रुवारी रोजी स्वयंपाक न केल्याने दारूच्या नशेत नवऱ्याने खून केला. मीना बाळासाहेब दाभाडे (वय 45, रा. माळवाडी, ता. मावळ) हिच्या डोक्‍यात गॅस सिलेंडर टाकी टाकून खून केला. आज हिंगे याचा खून अशा एकूण पाच खुनाच्या घटना घडल्या. पोलिसांचा वचक दिसत नाही. औद्योगीक क्षेत्रातील पोलीस ठाणे असून कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्याची प्रतीक्षा आहे. या हद्दीत अवैध धंदे वाढले असून पोलीस ठाण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरीक सांगत आहेत. त्यातच काही पोलीस अधिकाऱ्यांनी जमिनीच्या गुन्ह्यातून कोट्यवधीची माया गोळा केली आहे. मावळात गुन्हेगारी व त्यात अल्पवयीनांचा समावेश वाढत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)