पूर्णते कडून पूर्णत्वाकडे….(प्रभात open house)

आज भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळून 72 वर्षे पूर्ण झाली. अनेक ज्ञात- अज्ञात देशभक्तांनी हाल अपेष्टा सहन करत वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळाले आहे. हे भारतीयांना विसरून चालणार नाही. स्वातंत्र्यानंतरच्या 72 वर्षात भारताने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली जाणवते. औद्योगिक, वैद्यकीय, वैज्ञानिक, साहित्य, आर्थिक, क्रिडा, सामाजिक, मनोरंजन, कला इ. क्षेत्रांमध्ये प्रातिनिधीक स्वरुपांमध्ये बरीच अशी नावे मिळतील की, ज्यांनी आपले सर्वस्व या क्षेत्रांसाठी पणास लावले.

या सर्वांनीच शुन्यांतून सुरू केलेली वाटचाल प्रयत्नांनी त्यांना त्यांच्या क्षेत्रात यशोशिखरावर घेऊन गेली. त्यांनी केलेली वैयक्तिक कामगिरी ही पर्यायाने भारताचेच नाव प्रगतीपथावर घेऊन जाणारी ठरली. यापैकीच वैज्ञानिक क्षेत्रातील एक मिसाईल व्यक्तीमत्व म्हणजेच डॉ. अब्दुल कलाम की त्यांनी घरोघरी पेपर वाटून आपले बालपण घालवले आणि पुढे इनोव्हेटिव्ह वैज्ञानिक अशी ख्याती मिळवून राष्ट्रपती पदापर्यंत पोहाचले. पूर्ण आयुष्यभर त्यांनी नवनवीन संकल्पना शिकून त्यात परिपूर्ण बनूनच ते कुशल प्रजातिकापर्यंत पाहोचले. स्वत:ला वैज्ञानिक म्हणून त्यांनी परफेक्‍ट होण्याचाच प्रयत्न केला. त्याचीच फलनिष्पती म्हणून पुढे आपल्या भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली आणि 2020 पर्यंत  आपला ‘भारत एक महासत्ता’ होण्याचे स्वप्न त्यांनी सर्व भारतीयांना उघड्या डोळ्यांनी पहायला भाग पाडले. त्याचे एकमेव कारण आपल्याकडे असणारी युवा शक्ती.

आपला भारत 71 वर्षांचा झाला असला तरी वय वर्षे 40 च्या आतील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. या सर्व तरुणांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात डॉ. कलामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आत्मविश्‍वास, प्रामाणिकपणा, जिद्द आणि महत्त्वाचे म्हणजे सामाजिक बांधिलकीच्या जोरावर प्रयत्नरत होऊन त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण होण्याचा ध्यास अंगी बाळगला पाहिजे. कारण पुराणांमध्ये म्हटल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट ही ‘पूर्ण’ते कडूनच पूर्णत्वाकडे जाते. त्यामुळे आपल्या देशाला परफेक्‍ट बनवायचे असेल तर प्रत्येक भारतीयांना वैयक्तिक स्तरावर परिपूर्ण बनावे लागेल. आज देशामध्ये भ्रष्टाचार, जातीजातीचे राजकारण, तरुणांमधील व्यसनाधिनता, स्त्रियांवरील वाढते अत्याचार, सार्वजनिक स्वच्छता, गरिबी इ. ज्वलंत विषयांवर अधिक काम करण्याची आवश्‍यकता आहे. फक्त आश्‍वासने, कायदे करून प्रश्‍न सुटत नाहीत तर त्यासाठी एक व्यक्ती म्हणून वैयक्तिक चारित्र्य आणि राष्ट्रीय चारित्र्य स्वत:मध्ये आचरणाची पद्धत आपल्या अंगी बाणून घेण्याची गरज आहे, की ज्यातून समाज घडेल आणि पर्यायाने भारत प्रगतीपथावर कायम राहण्यास अत्यंत मदत होईल. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कौशल्य प्राप्त करणे जशी प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे कौशल्यावर आधारित व्यवसाय निर्मिती करून त्यास प्रोत्साहन देणे ही शासनाचीही जबाबदारी आहे आणि चित्रपटक्षेत्रामध्ये निरनिराळे आशय असणारे, समाजातील ज्वलंत प्रश्‍नांवर आधारित चित्रपट बनत आहेत. त्यातून समाजामध्ये सकारात्मक ‘मत’ परिवर्तन होत आहे. पण स्त्रीयांवरील वाढते अत्याचार, भ्रष्टाचार, जातीयता, व्यसनाधिनता यासारख्या विविध समस्यांवर ‘मन’ परिवर्तन घडून येणे हाच एकमेव मार्ग आहे आणि याची सुरवात प्रत्येक नागरिकाने स्वत:पासून करावी. कधीही शाळेत, कॉलेजमध्ये न जाणारे हा शिवराज स्वराज्य निर्माण करू शकतात. तर आज अनुकुल परिस्थिती असणारा तरूणवर्ग ‘सुराष्ट्र’ निर्माण नक्कीच करू शकेल, यात शंका नाही.

– योगेश वा. कुलकर्णी , कोल्हापूर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)