पूराच्या पाण्यामुळे पर्यायी पूलही गेला पाण्याखाली; वाहतुकीचा मार्ग बदलला

बीड – तालुक्‍यील कर्झणी येथील तलाव भरल्याने रविवारी सायंकाळी त्यातील पाणी बिंदुसरा नदीपात्रात शिरले. परिणामी शहरातील बिंदुसरा नदीला पूर आला आणि पर्यायी पूल पाण्याखाली गेला. अचानक पुलावर पाणी आल्याने प्रशासनाची त्रेधातिरपीट उडाली. पोलिसांनी तात्काळ वाहतूक वळवून दोन्ही टोकांना बॅरिकेटस्‌ लावून हा पूल रहदारीसाठी बंद केला.

शहरातील बार्शी रोडवरील बिंदुसरा नदीपात्रातील पूल कमकुवत झाला असून वर्षभरापासून त्यावरील वाहतूक बंद केलेली आहे. निजामकाळात उभारेलल्या या पुलाची डागडुजी करण्यात आली; परंतु आता तो कालबाह्य झाला आहे. त्याशेजारी नवीन पूल प्रस्तावित असूनत्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. तथापि, या पुलालगत कमी उंचीचा तात्पुरता पर्यायी पूल तयार करण्यात आलेला आहे. धुळे- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गासह, बीड -परळी राज्यमार्गाची वाहतूक पर्यायी पुलावरुनच होते. आतापर्यंत मोठा पाऊस झाला नाही. त्यामुुळे पर्यायी पुलावरुन पावसाळ्यातही वाहतूक सुरुच आहे; परंतु रविवारी सायंकाळी कर्झणी तलाव फुल्ल झाल्याने त्यातील पाण्याचा विसर्ग बिंदुसरा नदीत झाला. परिणामी बिंदुसरेच्या पात्रातील पाणी वाढले. नदीचे संपूर्ण पात्र पाण्याखाली गेले. यावेळी पर्यायी पुलावरुनही पाणी वाहण्यास सुरुवात झाली. याची माहिती मिळताच उपअधीक्षक सुधीर खिरडकर, वाहतूक शाखेचे निरीक्षक धनश्‍याम पाळवदे यांनी पुलाकडे धाव घेतली.

दोन्ही बाजूला बॅरिकेटस्‌ लावण्यात आले असून पुलावरुन एकही वाहन जाणार नाही अशी व्यवस्था केली आहे. औरंगाबादहून सोलापूरकडे जाणारी वाहने पाटोदामार्गे वळविण्यात आली असून सोलापूरहून येणाऱ्या वाहनांना मोंढ्यातून मार्ग उपलब्ध करुन दिला आहे. पर्यायी पुलाला अद्याप बाधा पोहोचली नाही. मात्र, हा पूल पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्यास रहदारीसाठी आणखी काही त्रास जादा अंतराचा वळसा मारावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)