पूरग्रस्त केरळमुळे अननस “काटेरी’

पिंपरी – केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीने अननसाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अननसाची आवक घटल्याने दरामध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. इंधन दरवाढीनेही त्यात तेल ओतल्याने अननस अधिकच “काटेरी’ झाले आहे.

अननसाचा हंगाम हा उन्हाळ्यात असतो. या पिकासाठी दमट हवामान असणे गरजेच असते. जेवढी हवेत आर्द्रता जास्त तेवढे हे पिक चांगले येते. परंतु, हे पिक बाराही महिने उपलब्ध असल्याने तसेच गुणकारी असल्याने नागरिकांची याला मागणी असते. भारतातील केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, बिहार, आसाम आणि त्रिपुरा राज्यात मोठ्या प्रमाणावर अननसाची लागवड केली जाते. याबरोबर कोकणातही तुरळक ठिकाणी याची लागवड केली जाते.

इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये अननसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. पिंपरी-चिंचवड शहरातील फळ बाजारात केरळहून अननसाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते.

गेल्या महिन्यात केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम तेथील उत्पादनावर पडला आहे. मात्र, पुरामुळे केरळमधील अननसाच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. काही बागांची लागवड झाली होती. तर काही बाग तोडणीला आल्या होत्या. मात्र, पुराने सर्वकाही उद्धवस्त केले आहे. त्याचा परिणाम अननसाच्या निर्यातीवर झाला आहे. फळ बाजारात आठवडाभरापासून अननसाची आवक घटली आहे.

भाव दुपटीने वाढले आहेत. गेल्या आठवड्यात अननस प्रत्येकी 30 ते 40 रूपयाला मिळत होते. त्याला आता 70 ते 80 रूपये मोजण्याची वेळ ग्राहकावर आली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक महागल्याने त्याचीही भर दरवाढीमध्ये पडली आहे. तीन वर्षापूवी केरळमध्ये अननसाची आवक घटली होती. तेव्हा 1200 ते 1300 रूपये डझनापर्यंत अननसाचे भाव वाढले होते. त्यामानाने आता 700 ते 800 रूपये डझन अननसाचे भाव आहेत. परंतु, पुराचा दूरगामी परिणाम पाहता अननस अधिक महाग होण्याची शक्‍यता असल्याची माहिती फळ विक्रेता कुमार शिरसाठ यांनी दिली.

अननस महागल्याने ग्राहकांनीही त्याकडे पाठ फिरवली आहे. पुरामुळे केरळमधील अननसाच्या बागाच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. काढलेला माल वाहून गेला आहे. त्यामुळे शहरातील आवक घटली आहे. दुसऱ्या ठिकाणावरून शहरात अननस येण्याची शक्‍यता आहे. मात्र, तसे न झाल्यास येथून पुढे अननसाचे भाव चढेच राहण्याची शक्‍यता आहे.
– संतोष हसरगुंडे, फळ विक्रेता, पिंपरी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)