पूना टू पुणे

परदेशात खरेदी करताना माझ्या मराठी इंग्रजीमध्ये विक्रेत्याशी माझ संभाषण चालू होतं आणि मागून एक अनोळखी आवाज आला, “तुम्ही पुण्याच्या का?’ काय आनंद झाला की जगाच्या पाठीवर आपली पुणेरी’ म्हणून ओळख आहे. मी पुणेरी… आणि माझं पुणं..

आठवणीच्या वाटेवर मागे वळून पहाताना धुक्‍यात हरवलेलं ते पुणं दिसतंय. जिथे जन्मले, लहानाची मोठी झाले, ते माझं पुणं. आधी छोटंसं शहर आणि आता चहूबाजूंनी पसरलेलं महानगर. पेशव्यांचं पुणं, शिक्षणाचं माहेरघर, पेन्शनरांच पुणं, गणपती आणि मारुतींच पुणं, गमतीदार पाट्यांच पुणं, सायकलींचं पुणं, सांस्कृतिक वारसा असलेलं पुणं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माझ्या लहानपणचं पुणं.. काही पेठांचं पुणं… प्रत्येक पेठेचं वेगळंच वैशिष्ट्य असलेलं, लहान गल्लीबोळातील वाड्यांच पुणं… वाड्यात सर्वजण एका कुटुंबासारखे राहात. घराला कुलूप लावायाची गरज नव्हती. वाड्यांच्या इमारती झाल्या पण वाडासंस्कृती आजही फ्लॅटमध्ये टिकवून ठेवण्याचे प्रयत्न पुणेकर करताना दिसतात.आज एकमेकांच्या फ्लॅटच्या किल्ल्या ते सांभाळतात. सुट्टीच्या दिवशी गावाबाहेर फिरायला जायची ठिकाणं म्हणजे पद्मावती, चतु:शृंगी, विठ्ठलवाडी.

पुणं आता पसरलंय सर्व दिशांनी. ही सगळी ठिकाणं गावात आली आहेत. परराज्यातून, परदेशातून आलेल्यांनाही पुण्यानं आपलंसं करून घेतलंय. तेंव्हा शाळा घराजवळ. त्यामुळे शाळेत पायी जायचं. मराठी माध्यमांच्या शाळांची जागा आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतली आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. शनवारवाड्यावर जाऊन भेळ खाण्यासाठी हुशारीने परवानगी मिळवावी लागायची, हॉटेलमध्ये खाणे तर दूरच. कॉलेजमध्ये गेल्यावर कधीतरी इडली-सांबार शेअर करायचो, पण आता पुण्यातल्या उपहारगृहांची संख्या बघताना प्रश्‍न पडावा, घरी स्वयपाक बनतो कधी? डोसा ते काश्‍मिरी पुलाव आणि पंजाबी तडका ते गोव्याची फिशकरी याबरोबरच चीनी, इटालियन, आणि अनेक पाश्‍चिमात्य पदार्थांनी आपल्या ताटात हजेरी लावली आहे.

जस पुणं पसरलं तशी पुण्याची बाजारपेठपण विस्तारत गेली. मोठी किराणा दुकानं, बॅंका, शाळा, टुमदार उद्यानं यामुळे रोजचं जगणं सुखाचं, सोयीचं होत असलं तरीही अधूनमधून लक्ष्मीरोड आणि तुळशीबागेचा फेरफटका आयुष्यात जी लज्जत आणतो, तिला तोड नाही.

मला आठवत, माझ M.COM. चं कॉलेज संध्याकाळी 6 ते 8 असायचं, परत येताना भीती वाटायची – आमच्यापेक्षा आई-वडिलांना जास्त. आता रात्री उशीराही आतंकवाद्यांसारखा चेहरा झाकून दुचाकीवर फिरणाऱ्या मुली सर्वत्र दिसतात.

पुण्यात आता अहोरात्र रस्त्यावर धावतात विविध बनावटींच्या दुचाकी आणि चारचाकी. गर्दीतून रस्ता काढणारे आणि पार्किंगसाठी मिळाल्यावर खुश होणारे पुणेकर हा आजच्या पुण्याचा चेहरा आहे. दोन रुपयांच्या तिकिटात चित्रपट दाखवणारी चित्रपटगृहे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. किराणा मालाची दुकाने कमी तर मोबाईल फोनची दुकाने सर्वत्र दिसतात. प्रशस्त्र मल्टीप्लेक्‍सनी पुणं चमकत आहे. सुरवातीला जड गेलं, पण आता स्वीकारलंय त्यांना. आपल्या सृजनतेचा पुरेपूर वापर करून बनलेल्या पाट्या हा पुण्याचा ट्रेडमार्क आहे. चितळ्यांच दुकान दुपारी उघड राहणार म्हणून आनंदी होणारे आम्ही पुणेकर गणपतीच्या दहा दिवसात वारा प्यायल्यासारखे उत्साहात असतो. ढोलताशा, लेझीम, देखावे याची तयारी सुरु झाली की वातावरण चैतन्यान भरून जात. गणपती उत्सवाचा उत्साह कायम आहे, पण त्याच रूप थोडंस बदललाय. सजावटीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे हे स्वागतार्ह आहे. पण कर्कश्‍श डॉल्बीवरचालणारा गोंगाट, धांगडधींगा पाहून बाप्पाच म्हणेल, आता बास झाल. बंद कर हे विकृत प्रकार’ असं वाटत. वरवरचा उत्सव छान आहे पण उत्सवाचा आत्मा हरवलाय. दुसरीकडे उत्सवाच पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करणारेही आहेत. ढोलताशा पथकात महिलांचा सहभाग ही एक जमेची बाजू. उत्सवासाठी पुण्याबाहेरून येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे.

विकास हे एक पॅकेज असतं. चांगल्याबरोबरच काही नको ते बदलही होतात. सिमेंटच्या जंगलात पुण्याची हिरवळ हरवत चालली आहे. त्यासाठी काम करणारे वृक्षाप्रेमीही आहेत. वाढती लोकसंख्या आणि त्यामानाने कमी वेगाने वाढणाऱ्या सोयीसुविधा याचा ताण पुण्याचं आजचं व्यवस्थापन अनुभवतंय.

प्रदूषण, कचऱ्याची विल्हेवाट, पाणीपुरवठा, गुन्हेगारी, असुरक्षितता, बेशिस्त वाहतूक, पावसाळ्यात पाण्याचा निचरा असे प्रश्‍न आ वासून उभे आहेत. याचा परिणाम म्हणून की काय आपला संयम, संवेदनशीलता, सहनशक्ती, इतरांची कदर आणि त्यांच्याप्रती आदरभाव हरवत चालला आहे की काय अशी भीती वाटते.

पाश्‍चिमात्य संस्कृतीचा पगडा आपल्याला कुठे घेऊन जातो आहे याचा विचार गंभीरपणे करण्याची वेळ आली आहे. अधुनिकतेचा स्वीकार पण पाश्‍चिमात्यांच अंधानुकरण नकोय. तरुण पिढी हुशार नक्कीच आहे, त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. शिकणाऱ्या, नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढत आहे पण त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार, घटस्फोटांचं वाढणारं प्रमाण या चिंतेच्या गोष्टी आहेत.

अर्थात हे केवळ पुण्यातच घडतंय अस नाही, पण जगण्याचा दर्जा सुधारण्यासाठी यावर उपाय योजले पाहिजेत हे नक्की. उदा. व्यसनाधीनतेच प्रमाण वाढल आहे पण त्यासाठी कंबर कसून उभ्या असलेल्या आणि सक्रीय काम करणाऱ्या मुक्तांगण, सारख्या अनेक संस्था म्हणजे आशेचा किरण आहे. माझी आई सांगायची 1947 साली पुणं कस होत,
आता मी सांगतीय पुणं कस बदललंय, उद्या माझा मुलगा.. माझा नातू… असंच बघतील पुण्याकडे त्यांच्या नजरेतून.. शेवटी काय बदल घडतो, घडत राहील’ ही गोष्ट कायम आहे.

– डॉ. संजीवनी रहाणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)