पूनर्परीक्षेचा जाच कशासाठी?

शिक्षक, शिक्षणतज्ज्ञांचे मत : सर्वांना वेठीस धरल्याने विद्यार्थ्यांवर परिणाम
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.30 – राज्यात तसेच देशात सध्या पेपरफुटी हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. राज्यात दहावी व बारावीचे सहा ते सात पेपर व्हारयल झाल्याचे पुढे आले; मात्र बोर्डाने पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला नाही, तर केंद्रीय माध्यमिक बोर्डाचे (सीबीएसई) दोन पेपर दिल्लीत फुटले तर त्यांनी संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा परत घेण्याचा निर्णय घेतला. एकूणच ही पेपरफुटी आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षांवर शिक्षकांसह शिक्षणतज्ज्ञ नाराज आहेत. काही तुरळक ठिकाणी झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना वेठीस धरणे ही बाब चुकीची असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राज्यात इयत्ता दहावी व बारावीचे पाच ते सहा पेपर व्हायरल झाले तर सीबीएसई दहावीचा एक व बारावीचा एक पेपर फुटला असल्याचे समोर आले आहे. राज्यात काही पेपर सुरू होण्याआधी व्हायरल झाल्याचे पुढे आले. मात्र, तरीही पूनर्परीक्षा घेतली जाणार नसल्याचे सांगितले; तर सीबीएसईचा पेपर फुटला अशी चर्चाही नसताना दिल्लीत झालेल्या काही प्रकारावरून पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला. मात्र, या पेपरफुटीमुळे तसेच पूनर्परीक्षेमुळे दोन्ही बाजूने विद्यार्थ्यांनाच याबाबी सहन कराव्या लागल्या आहेत.

पेपरफुटी ही कोणत्या स्वरुपात झाली त्यावरून पेपर परत घ्यायचा की नाही हे समजते. एखादा पेपर परीक्षेआधी काही मिनिटे किंवा परीक्षेदरम्यान फुटला असेल तर त्याचा फारसा फायदा विद्यार्थ्यांना होत नाही. राज्यात पेपर फुटीचे प्रकार बहुतांशी अशाच प्रकारे आहेत. मात्र, त्यामुळे राज्यातील दहावी व बारावीच्या तीस लाख विद्यार्थ्यांचे पेपर परत घेणे चुकीचे आहे. पेपरफुटी किती प्रमाणात झाली यावरून बोर्ड तो निर्णय घेते. सीबीएसईबाबत नेमके काय घडले हे स्पष्ट नाही. मात्र, पूनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होतो ही बाब खरी आहे. – वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

पूनर्परीक्षा हा प्रकार विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे. पेपरफुटी होतेच कशी ही बाब रोखायला हवी. पेपरफुटीमध्ये बऱ्याचदा शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी यांचाच हात दिसून आला आहे. त्यामुळेच पेपर घेण्याची प्रक्रिया सनदी अधिकाऱ्यांकडे सोपवावी. त्यांनी काही जिल्ह्यांत कॉपीमुक्‍तचे अत्यंत चांगले काम केले आहे. एखाद्या ठिकाणचा पेपर फुटला तर तेवढ्या ठिकाणापुरता वेगळा पेपर काढून पुन्हा पेपर घ्यावा. मात्र, संपूर्ण यंत्रणेला वेठिस धरणे योग्य नाही. – अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

पूनर्परीक्षेच्या प्रक्रियेत सर्व यंत्रणाच कामाला लागते. यामध्ये शिक्षक, अधिकारी व विद्यार्थी सुध्दा येतात. विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्यानंतरच्या अनेक करियरविषयक गोष्टी ठरलेल्या असतात. काही पाच दहा टक्‍के लोक चुकीचे वागतात; मात्र त्याची शिक्षा सर्व विद्यार्थ्यांना होऊ नये. ज्या ठिकाणी पेपरफुटी झाली तेथील भागातील विद्यार्थ्यांचा पेपर पुन्हा घेतला जावा सर्वांचा नाही. – हरिश्‍चंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)