पु.ल. हे आनंदवनाचे ब्रॅंड अॅम्बॅसिडर

डॉ. विकास आमटे : पुलोत्सवांतर्गत कृतज्ञता सन्मान

पुणे – कुष्ठरोग्यांनी तयार केलेले कपडे पुलंनी स्वतः वापरून समाजाची मानसिकता बदलण्याची सुरुवात स्वतःपासून केली. त्या अर्थाने पुलं हे आनंदवनाचे ब्रॅंड अॅम्बॅसिडर होते, असे म्हटले तर वावगे होणार नाही. 35 वर्षे सातत्याने आनंदवनात येणारे पुलं आजही आमच्या रोमारोमात आहेत, अशी भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली.

ते पुलोत्सवांतर्गत आयोजित कृतज्ञता सन्मानात बोलत होते. यावर्षीचा कृतज्ञता सन्मान डॉ.अनिल अवचट यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांना देण्यात आला. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रूपये 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी बोलताना डॉ. विकास आमटे म्हणाले की, पुलंमुळे साहित्य, संगीत, कला अशा विविध क्षेत्रातील मंडळी आनंदवनात येऊ लागली. आमच्या कुष्ठरूग्णांच्या विविहाला पुरोहित म्हणून गोनिदा येत, तर वऱ्हाडी म्हणून पुलं, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, विश्राम बेडेकर, तीर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राचार्य राम शेवाळकर या दिग्गजांची हजेरी लागत असे, ही आठवण आज पुन्हा जागृत झाली. यांच्यामुळे संस्थानिकांपेक्षा जास्त दणक्‍यात आमच्या कुष्ठरूग्णांचे विवाह पार पडले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. या सगळ्या मंडळींच्या गप्पा आणि चर्चा म्हणजे अठरा-अठरा, बावीस-बावीस तासांच्या मैफली असत. या सगळ्यांमुळे आनंदवनाचे काम सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यास खूप मोठा हातभार लागला.

आमटे कुटुंबीयांची तिसरी पिढी समाजसेवेचे कार्य आज समर्थपणे सांभाळत आहे. हे कार्य म्हणजे घराणेशाही नसून समाजकार्याचा वारसा आहे. सगळ्या सुखसोयी सोडून तिथे राहून काम करत आहे हे खरेच कौतुकास्पद आहे. आत्मविश्वास आणि प्रसन्न हास्यासह हे काम करणे खूप मोठे आहे. पुलंचे आणि आमटे कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध होते. पुलंनी आम्हांला चांगुलपणा शिकवला. “गुण गाईन आवडीने’ हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. माझ्यातही समाजसेवेचे जे काही गुण आले, त्यामागे आमटे कुटुंबाच्या कार्याचे बीज आहे, असे डॉ. अनिल अवचट म्हणाले.

यावेळी आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार, कॉसमॉस बॅंकेंचे अध्यक्ष मिलिंद काळे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र चित्राव यांनी तर सतीश जकातदार यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)