पु.ल. यांच्या साहित्यातून जगाची सफर घडते

‘भाषाप्रभू पु.ल.’ परिसंवादात साहित्यिकांनी व्यक्‍त केले मत

पुणे – “आपल्या बहुआयामी लेखनातून पु.ल. देशपांडे यांनी साहित्य विश्‍वात मोलाची भर घातली आहे. विनोदी लेखन, प्रवासवर्णने, नाटक, व्यक्तिचित्रणात्मक लेखन अशा विविधांगी लेखनातून त्यांनी मराठी साहित्य तर प्रगल्भ केलेच आहे, शिवाय रसिकांना दर्जेदार साहित्याची देणगीही दिली आहे. पु.लं.चे साहित्य आजही मोहिनी घालते. मात्र, आपल्या साहित्यातून जगाची सफर घडविणाऱ्या पु.ल. यांचे साहित्य हे अनुवादाअभावी प्रादेशिक मर्यादेत अडकल्याची खंत विविध साहित्यिकांनी व्यक्त केली.

“आशय सांस्कृतिक’ आणि पु.ल.परिवार यांच्यातर्फे आयोजित पुलोत्सवांतर्गत “भाषाप्रभू पु.ल.’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये लेखक डॉ. आशुतोष जावडेकर, गणेश मतकरी, लेखिका रेखा इनामदार, मंगला गोडबोले हे सहभागी झाले होते. यावेळी पु.ल.च्या साहित्याबद्दल चर्चा करतानाच, आजच्या काळात अशा दर्जेदार साहित्याची वाचकांच्या मनावर भूरळ आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पुलंची प्रवासवर्णने, भाषिक ताकद त्याचबरोबर पुलंच्या बहुभाषित्वाचे पैलु रसिकांसमोर डॉ. आशुतोष जावडेकर यांनी उलगडले. यावेळी पुलंनी लिहिलेल्या काही पत्रांचे संदर्भ देत वाचन केले. यावेळी त्यांनी पुलंची “अपूर्वाई’ अधिक विस्तृतपणे उलगडली. गणेश मतकरी यांनी पुलंच्या अनेक नाटकांचे व आशयाचे संदर्भ दिले. “लास्ट अपॉईंटमेंट’ या नाटकाच्या नेपथ्य आणि साधेपणा, भेदकतेचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

पुलंमुळे खऱ्या अर्थाने व्यक्तीचित्र आणि प्रवासवर्णनांना प्रतिष्ठा प्राप्त झाली या अर्थाचे वाक्‍य आणि पुलंचा हजरजबाबीपणा रेखा इनामदारांनी रसिकांसमोर उलगडला. यावेळी गणगोत, आपुलकी, मैत्र या पुलंच्या व्यक्तीचित्र उलगडली.

मंगला गोडबोले यांनी पुलंचे साहित्य, पुलंनी केलेला अनुवाद आणि लेखन याबद्दल डॉ. आशुतोष जावडेकर, गणेश मतकरी, रेखा इनामदार यांना प्रश्‍न विचारत पुलंची बहुभाषेवरिल संपन्नता रसिकांसमोर सहज आणि ओघवत्या शैलीत मांडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.

तर बालगंधर्व येथे उलगडला पुलंचा “पोस्टिक प्रवास’
सामान्य रसिकांपासून ते दिग्गज कलावंतापर्यंत सर्वांशी पत्राच्या माध्यमातून मैत्र जोडणाऱ्या ‘पुलंचे पोस्टिक जीवन’ पुलोत्सवात उलगडले आणि उपस्थित रसिकांनी तो मंतरलेला काळ पुन्हा अनुभवला. पुलंनी लिहिलेल्या आणि पुलंना आलेल्या निवडक पत्रांचे अभिवाचन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अभिनेते गिरीश कुलकर्णी, अभिनेत्री मधुरा वेलणकर, प्रवीण जोशी यांनी केले.

हा दुर्मीळ पत्रांचा खजिना ज्योती आणि दिनेश ठाकूर यांनी उपलब्ध करून दिला. या पत्रांची निवड, संकलन आणि संहितालेखन प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. प्रवीण जोशी यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले. अकरावीत शिकणाऱ्या मुलांनी मार्गदर्शन मिळावे, यासाठी पुलंना लिहिलेले पत्र आणि उपदेश न करता पुलंनी हसतखेळत वडीलकीच्या नात्याने दिलेले उत्तर, रॉयल्टी न देता गुपचूप “अंमलदार नाटकाचे’ प्रयोग करणाऱ्या नाटक मंडळांची पुलंनी काढलेली खरडपट्टी अशा वेगवेगळ्या विषयावरच्या पत्रांचे अभिवाचन ‘पुलंमधला माणूसपणाचं’ दर्शन घडविणारे ठरले. “वाऱ्यावरची वरातचा प्रयोग पाहून त्यातल्या विधानांवर आक्षेप घेणाऱ्या आणि पुलंना सद्भिरुचीचे विस्मरण झाले आहे, असा आक्षेप घेणाऱ्या बाईंना देवाने यांना विनोद बुद्धी द्यावी’ अशा आशयाचे पत्र पुलंनी पाठविले. त्याचे अभिवाचन ऐकताना सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले.

गदिमा, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, अलका देव मारुलकर, स्वामी विज्ञानानंद या दिग्गजांना लिहिलेल्या पत्रातून पुलंचं “गणगोत’ उलगडलं आणि पुलंच्या निधनानंतर सुनीताबाईंनी पुलंना लिहिलेल्या पत्राचे अभिवाचन सुरू असताना सभागृह भावुक झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)