पुस्तकाच्या गावात सत्ताधाऱ्यांचा ग्रामसभेतून पळ

पाचगणी, दि. 1 (प्रतिनिधी) –
ग्रामस्थानी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ आलेल्या भिलार ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांना ग्रामसभेतून पळ काढण्याची नामुष्की आली, ग्रामसभा थहकूब झाली असून सत्ताधाऱ्यांचा कारभार स्वच्छ असेल तर त्यांनी पुन्हा ग्रामसभेला सामोरे जावे, असे खुले आव्हानच भाजपाचे तालुकाध्यक्ष तानाजी भिलारे, सेनेचे युवासेना प्रमुख नितीन भिलारे, शंकरराव भिलारे,प्रकाश भिलारे, चेतन पार्टे, हेमंत भिलारे, अशोक भिलारे यांनी केले.
भिलार ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आली होती. या सभेत सत्ताधारी गट आणि विरोधक यांच्यात वादंग होऊन सत्ताधारी गट सभेतून बाहेर पडला. याबाबतची वस्तुस्थिती ग्रामस्थांना समजावी म्हणून या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नितीन भिलारे म्हणाले, ग्रामसेवकांनी सादर केलेल्या जमाखर्चाबाबत आम्ही त्यांना जाब विचारला, आक्षेप घेतला. पण कुणीही याबाबत आमचे निरसन केले नाही. भिलार ग्रामपंचायत फ्रुट वाईन विक्री परवाना देत नसल्याची माहिती भिलारे यांनी सभेच्या निदर्शनास आणून दिली. ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक एक परवाना प्रलंबित ठेवल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला. 1995 साली भिलार व पंचक्रोशीने उभी बाटली आडवी केली होती, पण एका व्यक्तीसाठी हा नियम कसा काय बदलला गेला? असा प्रश्न देखील भिलारे यांनी उपस्थित केला. किंगबेरी वाईनलाच परवाना कसा मिळाला? असा परखड सवाल भिलारे यांनी उपस्थित केला.

आम्ही उपस्थित केलेल्या कोणत्याच मुद्यांना व्यवस्थित उत्तरे दिली जात नव्हती. तानाजी भिलारे, चेतन पार्टे, प्रकाश भिलारे यांनी यावेळी ग्रामसभेत उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रश्नांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. भिलार गाव स्मार्ट ग्राम योजनेतून बाहेर कसे पडले? ग्रामपंचायतीच्या रंगरंगोटीला इतका खर्च कसा आला? गिरीजा भक्ती निवासाचे काय झाले? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचरा समस्या, खराब रस्ते आदी ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या दृष्टीने महत्वाचे आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने आवश्‍यक प्रश्न उपस्थित केले. पण या प्रश्नांचे उत्तर सत्ताधारी गटाकडे नव्हते. उलट त्यांनी आपण आता अडचणीत येणार या भावनेने चक्क ग्रामसभेतून पळ काढला. त्यांचे समर्थक देखील त्यांच्या या कृतीने अवाक्‌ झाले. आम्ही उपस्थित केलेल्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. केवळ स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यासाठीच ग्रामपंचायत सदस्यत्वाचा वापर सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेतून करण्यात आला.

आम्हाला त्यांनी सभा अर्धवट टाकून, तहकूब करून पळून जाणे अपेक्षित नव्हते तर त्यांनी प्रामाणिकपणे आमच्या शंकांचे निरसन करावे अशी आमची अपेक्षा होती. सत्ताधारी गट ग्रामपंचायती मध्ये तरी आम्हाला उत्तरे देईल असे वाटल्याने आम्ही ग्रामपंचायतीमध्ये गेलो तर त्यांनी तिथून देखील पळ काढल्याची माहिती तानाजी भिलारे यांनी दिली.

कोणतेही विषय मंजूर न होताच, सभेचे अध्यक्ष व सहकाऱ्यांनी सभा उधळून लावून गोंधळ घालून सभेतून पळ काढला असल्याने ही सभाच रद्द झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाने पुन्हा ग्रामसभा घेऊन आमच्या प्रश्नांचे निराकरण करावे. सत्ताधारी गटाच्या या पळपुटेपणामुळे ग्रामस्थ कमालीचे नाराज झाले असून ते संतप्त, आक्रमक देखील झाले असून पुन्हा ग्रामसभा न घेतल्यास तीव्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामसभा पुन्हा घ्या आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या, असा आग्रहच या पत्रकार परिषदेतून करण्यात आला.

विषयपत्रिकेवरील सर्व विषय आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आले असून ग्रामस्थानी लेखी स्वरूपात विचारलेल्या प्रश्नांची, शंकांचे निरसन या सभेत करण्यात आले असल्याची माहिती सभेचे अध्यक्ष, जेष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी दिली. आयत्या वेळचे सर्व विषय संपल्यानंतर सभा शांततेत पार पडत असल्याचे काहींना खुपल्याने त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ग्रामसभेचे गांभीर्य आबाधित राहावे या जाणिवेने सभेचा अध्यक्ष या नात्याने मी सभा संपल्याचे जाहीर केले. सभा नियमानुसार झाल्याने ती परत घेण्याचा प्रश्नच नाही.
– बाळासाहेब भिलारे अध्यक्ष ग्रामसभा..


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)