पुस्तकाच्या गावात एस्टीसेवा बंद

प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मोठी अडचण

पाचगणी, दि. 13 (प्रतिनिधी) – पुस्तकांचे गाव म्हणून ओळख निर्माण झालेल्या भिलार गावाला जाणाऱ्या मेढा आणि महाबळेश्‍वर आगाराने एसटी फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागला आहेत. दरम्यान, भिलारमध्ये स्वागत कमानींचे काम सुरु असल्याने मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. परंतु, पर्यायी रस्ता काढून देण्यात आला आहे.

पुस्तकाच्या गावात सध्या स्वागत कमानी उभारण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे गावातील मुख्य रस्ता बंद करण्यात आला. भिलार मधून जाणारा हा रस्ता पुढे दानवली, कासवंड, उंबरी, घोटेघर, आखेगणी, सायघर, मेढा आदी गावांना जोडला जातो. त्यामुळे येथील ग्रामस्थ, नोकरदारांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दुसरा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, पर्यायी रस्ता वाहतुकीस योग्य नसल्याने कारण देऊन महाबळेश्‍वर आणि मेढा आगाराने आपल्या बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे या गावांमधील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, सध्या दहावीची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे भिलारसह पुढील सर्व गावांमध्ये पर्यायी मार्गाने इतर वाहने ये-जा करत आहेत. याशिवाय लांब पल्ल्याच्या एसटी बसेसही येत आहेत. मात्र, असे असताना महाबळेश्‍वर आणि मेढा आगाराच्या एसटीला पर्यायी रस्त्याची भीती वाटत आहे की काय? असा संतप्त सवाल होऊ लागला आहे.

अन्यथा तीव्र आंदोलन करु
गेल्या आठ-दहा दिवसांपासून भिलारपासून पुढे असलेल्या चार-पाच गावांना जाणारी एसटीसेवा मेढा आणि महाबळेश्‍वर आगाराने बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे विशेषत: दहावीच्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही आगाराने कोणतेही कारण पुढे न करता लवकरात लवकर एसटी सेवा पूर्ववत सुरु करावी, अन्याथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागले, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

एसटीच्या अधिकाऱ्यांना हवे आहे पत्र
मुख्य रस्ता बंद असल्याने पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरु आहे. या रस्त्याने सर्व प्रकारची वाहने जात आहेत. मात्र, सदरचा पर्यायी रस्ता हा वाहतुकीसाठी योग्य असल्याचे बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीने लेखी पत्राद्वारे द्यावे तरच एसटीच्या फेऱ्या सुरु केल्या जातील, असे महाबळेश्‍वर आगाराचे वरिष्ठ अधिकारी पतंगे साहेब यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)