पुस्तकांच्या गावा जावे…

अश्‍विनी महामुनी

बुधवारी पेपर वाचत असताना सहज एका बातमीकडे लक्ष गेले. मसाप या छोट्या नावानेच अधिक प्रसिद्ध असलेली एक सर्वार्थाने मोठी संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद जागतिक पुस्तक दिनानिमित्त मुद्रित शोधकांचा सन्मान करणार असल्याची ती बातमी होती ती. बातमीने लक्ष वेधून घेण्याचा दोन कारणे. एक म्हणजे जागतिक पुस्तक दिन असतो ही गोष्टच पुस्तकाच्या जगात वावरणाऱ्या अनेक लोकांनाही माहीत नसते. (इतरांचा प्रश्‍नच नाही.) मलाही माहीत नव्हती. कधी कानावरून वा नजरेखालून ही गोष्ट गेली असली तरी ती लक्षात राहिली नव्ह्ती. मात्र, या बातमीमुळे ती आता कायमची लक्षात राहील. पुस्तके ही आमची जन्माची साथीदार. अगदी समजायला लागल्यापासून आपली पुस्तकांशी दोस्ती होते. पूर्वी अंकलिपीपासून वाचनाची सुरुवात व्हायची. अंकलिपीमुळे मुळाक्षरे, बाराखडी आणि आकड्यांची ओळख व्हायची. त्यात चित्रे असायची. अर्थात, ती आजच्या पुस्तकांतील चित्रांइतकी सफाईदार, सुंदर आकर्षक नसायची; पण त्यांचे आकर्षण मोठे असायचे. माझ्या लहानपणी चार आण्यात अंकलिपी मिळायची. अ-अननस, आ-आगगाडी…. अशी बाराखडी आणि अक्षरानुरूप चित्रे असणारी अंकलिपी तेव्हाचे सर्वात महत्त्वाचे पुस्तक होते. आणि आमच्या वर्षाला दोन-चार तरी अंकलिप्या व्हायच्या. अंकलिपी हे तुमच्या आमच्या वाचनाचे आद्य पुस्तक होते. वाचनाच्या या रोपाचा पुढे वृक्ष बनला.

पुढे शालेय पुस्तके आली. त्यापूर्वीही काहींच्या हातात, त्यात आमचा आवर्जून समावेश करावा लागेल, गोष्टींची पुस्तके आली. माझ्या आजोबांना वडिलांना-काकांना वाचनाची मोठी आवड असल्याने घरात पुस्तकेच पुस्तके असायची. वृत्तपत्रे असायची आणि अनेक मासिकेही असायची. त्यात काही मुलांसाठीही असायची आणि ती आवर्जून वाचायला लावली जायची. माझे आजोबा गोष्टी फार छान सांगत. मला आणि माझ्या भावाला एकदम कडेवर घेऊन रात्रीच्या वेळी अंगणात शतपावली करताना ते मजेदार बालगीते म्हणून दाखवत.म्हणायला लावत. घरातल्या झोपाळ्यावर बसून संध्याकाळच्या वेळी देवासमोर “शुभं करोती’ म्हणून झाल्यावर माझी आजी आम्हाला जवळ घेऊन झोपाळ्यावर बसायची आणि तासभर वेगवेगळी स्तोत्रे, परवचा म्हणायला लावायची, गोष्टी सांगायची. मात्र तिच्या गोष्टी आणि आजोबांच्या गोष्टींमध्ये जमीन अस्मानाचा फरक असायचा. तिच्या गोष्टी नेहमी देवादिकांच्या असायच्या. पुराणातल्या, रामायण-महाभारतातल्या असायच्या, आटपाट नगरातील कहाण्या असायच्या त्यात. त्या अजूनही चांगल्या आठवतात. पुढे गोष्टी सांगण्याची-वाचनाची आवड वाढतच गेली. शिक्षण चालू असतानाच वडिलांच्या प्रोत्साहनाने लिखाणाचीही आवड निर्माण झाली. सवय झाली आणि ती कायम राहिली. दिसामाजी काहीतरी लिहावे हे आचरणात येऊ लागले. सुदैवाने पुढे शिक्षणक्षेत्रातच प्रवेश झाल्याने त्याला खतपाणी मिळाले. आणि आता माझ्या मुलालाही वाचनाची चांगलीच आवड असल्याचे मला जाणवू लागले आहे. शाळेतील, आजूबाजूच्या मुलांमध्ये वाचनाची तशी मोठी आवड नसल्याचे दिसत असल्याने ओंकारला पुस्तके वाचायला आवडत असल्याने मला मोठे समाधान वाटते. अभिमान वाटतो.

आजच्या या मोबाइल-इंटरनेटच्या जमान्यात मसापसारख्या संस्थांचे महत्त्व शब्दातीत आहे. आणि मुद्रितशोधकांचा सन्मान करण्याचा त्यांचा उपक्रम तर प्रचंड प्रशंसनीय आहे. जो बहुधा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम असावा. मुद्रितशोधकांचे म्हणजे प्रूफरीडर्सचे काम तसे किचकट, महत्त्वाचे असूनही दुर्लक्षितच. कानामात्रा अकारउकार विरामचिन्हे आणि योग्य शब्दांची निवड यामुळे केवढा फरक पडतो, अर्थाचा अनर्थ होऊ शकतो याचा आपल्या सर्वांनाच कधी ना कधी अनुभव आलेला असतो. पण तरीही त्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. पेशवाईत आनंदीबाईंनी केलेल्या ध च्या मा ने केवढा अनर्थ केला हे आपण इतिहासात वाचले आहे. इतिहासाचे सोडा पण आता व्हॉट्‌सऍपवर सुद्धा मुद्रितशोधकांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या पोस्ट्‌स कधीमधी येत असतात. अलीकडेच आलेली एक पोस्ट -शीर्षक आहे चंदूच्या बायकोचे पत्र-

प्रिय प्राणनाथ,
तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला. दम्याचा त्रास होतो कुत्रीला. आज चार पिल्ले झाली मामाला. दाढी करताना ब्लेड लागले वहिनीला. दवाखान्यात ऍडमिट केले बकरीला. हजार रुपयात विकले आत्याला. नमस्कार तुमची लाडकी गंगू. ….

आता ही केवळ गंमत असली, तरी शुद्धलेखनाचे -मुद्रितशोधकांचे महत्त्व जाणवून देणारी आहे. त्यामुळे मुद्रितशोधकांचा सन्मान करणाऱ्या मसापला त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मन:पूर्वक” आणि त्रिवार सलाम”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)