पुस्तकांच्या गावाला जाऊ या…

किलबिल किलबिल पक्षी बोलती…
घरोघरी हे ग्रंथचि दिसती…
स्ट्रॉबेरीच्या मळ्यामध्येही…
पुस्तक वाचते कोणी…
गाव पाहिला बाई आज मी…
पुस्तकांचा गाव पाहिला बाई…

हो आश्‍चर्य वाटते आहे ना? नाही खरंच, असा पुस्तकांचा खजिनाच असलेला हे सुंदरस गावं आहे. पाचगणी आणि महाबळेश्‍वरच्या मध्ये. पाचगणीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेलं भिलार गावं येतं सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्‍वर तालुक्‍यात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर अशा या टुमदार गावाचे वैशिष्ट्‌य म्हणजे या गावाला पुस्तकांचे गावं म्हणून ओळखले जाते. भारताचे दिवंगत राष्ट्रपती आणि “मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन “वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून भिलार या गावाला भेट दिली अगदी सहकुटुंब. विशेष म्हणजे हे देशातील पहिले-वहिले “पुस्तकांचे गाव’ आहे.

इतकी पुस्तके पाहून मन खरोखर भारावल्यासारखे झाले. गावात पोहोचताच आपण तिथल्या निसर्गरम्य वातावरणाच्या प्रेमात पडतोच, यात शंकाच नाही. छोटी-छोटी टुमदार घरे पाहून मन प्रसन्न होते. स्ट्रॉबेरीचे मळे मनाला आनंद देऊन जातात.
सर्वात आधी या प्रकल्पाच्या कार्यालयाला भेट दिली. तिथे गौरव धर्माधिकारी आणि उपस्थित सदस्यांनी मार्गदर्शन करत कोणते दालन कुठे आहे याची माहिती दिली. दालन म्हणजे प्रत्येक विषयाच्या पुस्तकांसाठी ग्रामस्थांनी आपल्या घरातच एका एका खास विषयाच्या पुस्तकाला जागा करून दिली आहे. प्रत्येक दालनात हजारपेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह आहे.
यात चरित्र-आत्मचरित्र, कादंबरी, पर्यटन, स्त्री-साहित्य, मासिक, दिवाळी अंक, बालसाहित्य, ऐतिहासिक अशी तीसच्या आसपास विभागणी आहे. प्रत्येक दालनात बसण्यासाठी निवांत अशी जागा आहे. मोसमात स्ट्रॉबेरीचा आस्वाद असतोच जोडीला.

भारतातील पहिले पुस्तकांचे गावं म्हणून या गावाला मान मिळाला ते राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रयत्नामुळे तसेच गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे. अनेक मान्यवरांनी कवी, लेखक तसेच पुस्तकंप्रेमी सिनेकलाकारांनीसुद्धा या गावास भेट देऊन त्यांचे अभिप्राय देत या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे. मोबाईलच्या युगात खरे तर आपण पुस्तकांपासून हळूहळू दूर जाऊ लागलो होतो; पण हे गावं पाहिल्यावर विचारांनी समृद्ध अशी लोकं अजूनही आहेत याचा प्रत्यय येतो.

शहरातील गडबड, गोंधळ ध्वनिप्रदूषण,नोकरीसाठीची रोजची धावपळ यातून पुस्तकांसाठी पुरेसा वेळ काढणे बरेच जणांना शक्‍य होत नाही. आणि म्हणूच हे गावं त्यावर छानसा पर्याय आहे. आयुष्यातील काही निवांत क्षण निसर्गाच्या, पुस्तकांच्या सहवासात घालवायचे असतील तर नक्की या गावाला भेट द्या.

महाबळेश्‍वरच्या सहलीमधे या गावासाठी आवर्जून एक दिवस राखून ठेवा. लहान मुलांना मोबाईल, टेलिव्हिजन युगात पुस्तकांची गोडी कशी लावावी, हा मोठ्ठा प्रश्‍नच होताच पण हा प्रश्‍न चुटकीसरशी सुटतो येथे गेल्यावर. बालसाहित्य या विभागात खूप पुस्तके पाहून मुलांमध्ये आपसूकच ती वाचण्याचा मोह निर्माण होतो आणि पुस्तकांची एकदा लागलेली गोडी पुन्हा दूर होणे नाही.

तर मित्र-मैत्रिणींनो एकदा या गावाला नक्की भेट द्या. दोन-तीन दिवस तरी सुट्टीमधे मुलांना घेऊन तिथे रहा. राहण्याची उत्तम व्यवस्था उपलब्ध आहे. या निसर्गरम्य वातावरणाचा लाभ घ्या मुलांना करून द्या. भरपूर वाचा समृद्ध व्हा. पुस्तके, निसर्गरम्य वातावरण आणि सोबत स्ट्रॉबेरी म्हणजे बहार. सुख म्हणजे नक्की काय असते, याचे उत्तर इथेच मिळते असे म्हटले तरी हरकत नाही.

– मनिषा संदीप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)