पुस्तकांचे ओझे कमी होण्यास आणखी दोन वर्षे

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री : देशभरातून एक लाख जणांच्या सूचना

पुणे – विद्यार्थ्यांच्या मानगुटीवरील अभ्यासक्रम व त्यामुळे येणारे पुस्तकांचे ओझे निम्म्याने कमी करण्याची घोषणा केल्यानंतर देशातील शिक्षणतज्ज्ञांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी एक लाख जणांच्या सूचना आल्या असून, त्यानुसार परीक्षण होत आहे. येत्या दोन वर्षांत अभ्यासक्रमांचे ओझे कमी होतील, अशी ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे दिली.

सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेस जावडेकर यांनी शुक्रवारी भेट देत शैक्षणिक प्रयोग प्रदर्शन, “धडपड’ प्रयोगशाळेची त्यांनी पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी संवाद साधला आणि वाटचालीची माहितीदेखील त्यांनी घेतली. यावेळी ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, कार्यवाह सुभाष देशपांडे, यशवंतराव लेले, डॉ. वा.ना. अभ्यंकर, डॉ. विवेक कुलकर्णी, प्राचार्य मिलिंद नाईक, प्रा. राम डिंबळे, प्रा. विवेक पोंक्षे, मोहन गुजराथी उपस्थित होते. विक्रम जिगराळे व चिन्मयी खरे या विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचे सादरीकरणाद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जावडेकर यांनी केंद्र सरकारने केलेल्या घोषणांचा आढावा घेतला. केंद्र सरकारने केवळ शिक्षकी पेक्षा स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बी.ए., बी.कॉम. अथवा बी.एस्सी. बी.एड. असा चार वर्षाचा इंडिग्रेटेड कोर्स सुरू केल्याचा पुनर्उच्चार केला. शिक्षण हक्‍क कायद्यातील तरतुदीत बदल करून पाचवीपासून परीक्षा घेण्याच्या निर्णयही लोकसभेत मंजूर झाला असून, आता तो राज्यसभेत आहेत. या विधेयकावरून राज्यांना परीक्षा घेण्याचा पूर्णत: अधिकार प्राप्त होणार आहे. परीक्षा घ्यायची की नाही, हे राज्य शासनाने ठरविणे आवश्‍यक आहे.

विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रानुसार शिक्षण मिळायला हवे. परंतु आधीच अभ्यासक्रमाचे ओझे असल्याने विद्यार्थी पूर्णत: पुस्तकी शिक्षणात अडकून बसतात. त्यामळे केंद्र सरकारने अभ्यासक्रम 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या कार्यवाही सुरू आहे. अभ्यासक्रमाचे ओझे कमी करून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यात्मक शिक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे जावडेकर यांनी म्हटले.

ज्ञानप्रबोधिनीचा आदर्श
ज्ञानप्रबोधिनीच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगातून देशात नवोदय विद्यालयाची संकल्पना सुरू झाली. समाजोपयोगी व विशेष बुध्दीमान विद्यार्थ्याना घडविण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीचे कार्य कौतुकास्पद आहे. माजी विद्यार्थ्यांच्या आधारावर प्रशालेचे दैदीप्यमान कारकीर्द सुरू आहे, हे उल्लेखनीय बाब आहे. या प्रशालेची ही परंपरा देशातील शिक्षणसंस्थापुढे आदर्श आहे, असेही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)