पुसेगावच्या बैलबाजारात मोठी उलाढाल

औताच्या बैलजोडीला मोठी मागणी

पुसेगाव, दि. 8 (प्रतिनिधी) – शेतीसाठी शेतकऱ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी शेतीच्या अनेक कामांसाठी शेतकऱ्यांना बैलांवर अवलंबून रहावे लागते. देखण्या व औताच्या बैलजोडींना पुसेगाव बैलबाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळेच रथादिवशी व दुसऱ्या दिवशी बैलबाजारात सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाली. यात्राकाळात जनावरांच्या बाजारात मोठी तेजी राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेदरम्यान येथे भरणारा बैल बाजार खिलार जनावरांसाठी पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. बैलगाडी शर्यतींवरील बंदीमुळे खिलारजनावरांच्या संगोपनात घट झाली असली तरी सध्या या बाजारात चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मनमाड, औरंगाबाद, जालना सातारा, सांगली, पुणे येथून खिलार जनावरांच्या शौकिन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहेत. बैलबाजारात खोंडाना कमीत कमी 30 हजार रुपये किंमत आहे. सध्या राज्यात असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे व चाराटंचाईमुळे पशुधन संभाळणे शेतकऱ्यांना जिकीरीचे झालेले आहे. त्यामुळे जत, सांगली, सांगोला, कवठेमहंकाळ या भागातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणली आहेत. पण त्यांना योग्य भाव मिळत नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. शेतीकामाबरोबरच आषाढी वारीला जाणाऱ्या ज्ञानोबा माऊली व तुकोबाराया यांच्या पालख्यांना आपली बैलजोडी देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने इच्छुक असतात. या पालख्यांना देखणी व मोठी बैलजोडी मिळावी, या अपेक्षेने पुणे जिल्ह्यातून शेतकरी मोठ्या संख्येने आलेले आहेत.

पारगाव, ता. दौंड येथील माऊली ताकवणे यांनी पालखीसाठी 4 लाख 75 हजार रुपयांची देखणी बैलजोडी या बैलबाजारात खरेदी केली तर धायरी (जि. पुणे) येथील प्रगतशील शेतकरी सागर तळेकर यांनीही खिलार जनावरांचे प्रसिध्द व्यापारी राजू गिरी यांच्याकडून तीन लाख 42 हजार रुपयांना देखणा व मजबूत बैल खरेदी केला. जनावरांच्या बाजारात शेतकऱ्यांसाठी सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे मोफत चारा, पाणी, वीज तसेच लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच गोरगरीब शेतकऱ्यांसाठी केवळ पाच रुपयांत जेवणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. यात्रेत चरितार्थासाठी आलेल्या गोरगरीब महिलांना ट्रस्टतर्फे बेसन व बाजरीचे पीठ व गोडेतेल मोफत देण्यात आले आहे. प्रति जेवण मिळणारे पाच रुपये या बाजारात स्वयंपाक बनवून देणाऱ्या या महिलांना देण्यात येत असल्याचे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व विश्वस्त मोहनराव जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)