पुलोत्सवाच्या मैदानावर सचिनची “बॅटींग’

“आय लव्ह पीएल’ आणि पुलोत्सव कार्यक्रम पत्रिकेचे उद्‌घाटन

पुणे – क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर.. पुलंचे नातेवाईक.. प्रसन्न वातावरण.. विविध क्षेत्रांतील मान्यवर.. सचिनचे चाहते.. पुलोत्सवचा उत्साह.. पूर्वसंध्येला होणारे लोगोचे अनावरण आणि पुलंचे निवासस्थान “मालती-माधव’.. हा सगळा योग जुळून आला, “आय लव्ह पीएल’ या कार्यक्रमात लोगोच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने.

-Ads-

शनिवारपासून (दि.17) सुरू होणाऱ्या ग्लोबल पुलोत्सवाच्या पूर्वसंध्येला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांच्या हस्ते “आय लव्ह पीएल’ (मी पुलं प्रेमी) आणि पुलोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेचे उद्‌घाटन झाले. यावेळी पुलंचे भाचे दिनेश ठाकूर, ज्योती ठाकूर, सुचेता लोकरे आणि अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, “आशय’ सांस्कृतिकचे विरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, कॉसमॉसचे मिलिंद काळे, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते. डॉ. अरुणा ढेरे यांनी सचिनच्या वडिलांच्या काही आठवणी सांगितल्या.

पुलंचे साहित्य हे अजरामर असून त्यांनी कलेच्या ज्या ज्या क्षेत्रांत संचार केला तेथे पुलंची छाप आहे. साहित्य, कला, चित्रपट आदी कला क्षेत्रांतील पुलंचा वावर आपल्या पिढीतील काही लोकांना अनुभवता आलाही असेल परंतु अलिकडील पिढीस पुल जाणून घेण्यासाठी त्यांना उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुलंच्या बहुगुणांचा आस्वाद घ्यावा. तरुणांनी ही संधी दवडू नये, असा सल्ला सचिन तेंडूलकरने दिला.

पुलंच्या कुटुंबियांकडून मला मिळालेल्या आमंत्रणामुळे मी भारावून गेलो. मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीत. मला मिळालेले आमंत्रण हा मी माझा सन्मान समजतो. बाबा आणि पुल यांच्यातील मैत्रीचे धागे खूप चांगले होते. पुलंचे बाबांना येणारे पत्र मी पाहात असे. क्रिकेटमधील माझे आदर्श सर डॉन ब्रॅडमन यांच्या 98 व्या वाढदिवशी माझ्या मनात ज्या भावना होत्या, तशीच काहिशी अवस्था आता झाली असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले. पुलंचे साहित्य हे महान होतेच, परंतु त्यांचा सर्वसामान्य माणसांशी असलेले कनेक्‍ट मला खुप भावला. पुलंनी सातत्याने त्यांच्या साहित्य निर्मितीतून सर्वसामान्यांना आनंद दिला, असेही यावेळी सांगितले.

पुलंच्या कुटुंबियांनी सचिनला पुलंबरोबर काढलेल्या फोटो भेट दिला. हा फोटो 1996 साली काढला असल्याचे सचिनने सांगितले. तो फोटो म्हणजे माझ्यासाठी सोनेरी क्षण असल्याचेही सांगितले. यावेळी सचिनने पहिल्यांदा झालेल्या पुलंच्या भेटीचे आणि त्यांच्या घेतलेल्या आठवणींचे अनुभव सांगितले. पुल आणि मला “सी फुड’ फार आवडायचे आणि ती आमच्यातील समान गोष्ट होती, असेही त्याने सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)