पुलंचे विनोद शाब्दिक नाही, तर ते “बिटवीन द लाइन’

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ : चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन

पुणे – पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यात प्रत्येकवेळी आपल्याला विनोदाच्या नवीन जागा सापडतात. जितक्‍या वेळा आपण ते पुस्तक वाचू तितक्‍या वेळा नव्याने विनोद उलगडत जातात. सध्याच्या काळातील विनोद आणि ते सादर करण्याची पद्धत वेगळीच आहे. पण पुलंचा विनोद शाब्दिक नाही, तर तो “बिटवीन द लाइन’ आहे. त्यांचा विनोद शोधावा लागतो. त्यामुळे पु.ल. हे माझे दैवत आहेत, तर त्यांचे साहित्य संजीवनी आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

“पु.ल.परिवार’,”आशय सांस्कृतिक’ आणि “स्क्‍वेअर वन’ आयोजित “पुलोत्सअवांतर्गत चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन सराफ यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी शांताराम फाउंडेशनचे किरण व्ही. शांताराम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

सराफ म्हणाले, “पुलंचे आणि माझे घरचे नाते आहे. आम्ही दोघेही बेळगावचे आहोत. त्या बद्दलची एक आठवण आहे, पु. ल. हे माझ्या एका चित्रपटाच्या “प्रीमिअर’ला आले होते आणि तेव्हा त्यांनी मला चित्रपटाबद्दल काही न सांगता, “बाबा कसे आहेत?’ असा प्रश्‍न विचारला होता. त्यावेळी मला खूप बरे वाटले. मी या पुलोत्सवाचा एक भाग आहे, हे माझे भाग्यच आहे. आज या प्रदर्शनाचे उद्‌घाटन माझ्या हस्ते होत आहे, याची कल्पना मला करवत नाही. मी स्वत:ला भाग्यवान समजतो. माझ्या विनोद सादरीकरणामध्ये मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकत आलो आहे आणि जोपर्यंत कॉमेडी सादर करतोय, तो पर्यंत “पुल’ हे नाव कायम स्मरणात राहिल. आपण पु.ल. वाचतोय हे त्यांच्या लिखाणाचे यश आहे आणि जो पर्यंत त्यांचे साहित्य वाचणारा वाचक आहे, तोपर्यंत त्यांचे नाव पुल हे नाव कायम वाचकांच्या मनात राहिल. पुलंच्या स्मृती चिरकाळ टिकण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेऊन कायम प्रयत्नशिल राहिले पाहिजे. जो पर्यंत असे उपक्रम चालू आहेत, तोपर्यंत त्यांना कोणी विसरू शकत नाही. येथे बसलेल्या पांढऱ्या केसांबरोबर काळ्या केसांपर्यंतही पु.ल. पोहोचले पाहिजेत, अशी टिप्पणी सराफ यांनी केली. म्हणजेच तरुणापर्यंत त्यांचे साहित्य पोहोचले पाहिजे, असा त्यामागचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला.

यावेळी किरण शांताराम, प्रकाश मगदूम, मेघराज राजेभोसले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र चित्राव यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले. पुलोत्सवानिमित्त आजपासून अर्काइव्ह थिएटर येथे सुरू झालेल्या चित्रपट महोत्सवात रसिकांनी आज “फूल और कलियॉं’, “द इन्स्पेक्‍टर जनरल’, “गुळाचा गणपती’, “द बॅरेटस्‌ ऑफ विंपोल स्ट्रीट’ या चित्रपटांचा आस्वाद घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)